चंद्रपूर: Chandrapur Drug Free Mission अंतर्गत चंद्रपूर पोलीस administration अत्यंत ॲक्शन मोडवर आले आहे. महाविद्यालयीन परिसरातून अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला जिल्ह्यातील तब्बल ५२ महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. पोलीस आणि शिक्षण संस्थांच्या समन्वयातून संपूर्ण जिल्हा अमली पदार्थमुक्त करण्याचा मुख्य उद्देश आहे. (हे हि वाचा – अचानक नदीचे पाणी मागे, चंद्रपुरात पूर सदृश्य स्थिती)
महाविद्यालयीन परिसरात अमली पदार्थांच्या विक्रीवर पूर्ण बंदी
चंद्रपूर जिल्ह्यातील महाविद्यालयीन परिसरातून अमली पदार्थांच्या जाळ्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि तरुण पिढीला व्यसनाधीनतेच्या विळख्यातून वाचवण्यासाठी पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन प्राचार्यांची एक महत्त्वपूर्ण संयुक्त चर्चासत्र बैठक पार पडली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती करणे आणि संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याला पूर्णपणे अमली पदार्थमुक्त करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. या प्रसंगी उपस्थित सर्व प्राचार्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने ‘सुरक्षा मंत्र’ पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
संशयित हॉटस्पॉट्सची ओळख पटवून कडक कारवाई करणार
या बैठकीदरम्यान महाविद्यालयीन तरुणांना अमली पदार्थांच्या धोक्यापासून दूर ठेवण्यासाठी नियमित समुपदेशन सत्रे आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच, महाविद्यालयांचा परिसर आणि आजूबाजूचे संशयित भाग, जिथे अमली पदार्थांची खरेदी-विक्री होण्याची शक्यता असते, अशा सर्व हॉटस्पॉट्सची तात्काळ ओळख पटवून तेथे पोलीस प्रशासनाकडून अत्यंत कडक व प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत उपस्थित प्राचार्यांनीही अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आपापल्या व्यावहारिक सूचना मांडल्या. विद्यार्थ्यांमधील व्यसनाधीनतेची सुरुवातीची लक्षणे कशी ओळखावीत, अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांना योग्य वेळेत ओळखून त्यांना या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी कशी मदत करावी, यावर प्राचार्यांनी सखोल मार्गदर्शन केले. प्राचार्यांनी मांडलेल्या सर्व सूचनांची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून पोलीस विभाग, शिक्षण संस्था आणि इतर संबंधित विभागांच्या परस्पर समन्वयातून जिल्ह्यातील अमली पदार्थांचे जाळे मुळापासून उखडून टाकण्याचा दृढ निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी स्पष्ट केले की, विद्यार्थी हे देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत आणि त्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या अमली पदार्थ माफियांवर पोलीस प्रशासन कोणतीही गय न करता अत्यंत कठोर कारवाई करेल. या मोहिमेला पूर्ण यश मिळवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, प्राध्यापकवृंद आणि पालकांनी पोलिसांना सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीस पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, भरोसा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा वाडेकर, दामिनी पथक व सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार आणि जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे ५२ प्राचार्य प्रामुख्याने उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






