चंद्रपूर: Chandrapur Flood Alert चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पावसाने विश्रांती घेतली असली, तरी वर्धा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्याने गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. वर्धा नदी फुगल्यामुळे तिच्या उपनद्या इरई आणि झरपटचे पाणी मागे फिरल्याने (बॅक वॉटर) शहरातील सखल भागातील ५० हून अधिक घरांत पाणी शिरले आहे. तसेच चंद्रपूर ते राजुरा मार्गे तेलंगणा जोडणारा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. (हे हि वाचा – अंगणवाडी भरती प्रक्रियेत फसवणूक टाळा)
शहरात ‘बॅक वॉटर’चा फटका; ५० हून अधिक घरांत शिरले पाणी
वर्धा नदीचे पात्र तुडुंब भरल्याने झरपट आणि इरई नदीचे पाणी पुढे न जाता शहराच्या दिशेने मागे फिरले आहे. यामुळे आज पहाटेपासूनच चंद्रपूर शहरातील रहमतनगर, सहारा पार्क आणि भिवापूर वार्ड परिसरात पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. विशेषतः भिवापूर भागातील सुमारे ५० हून अधिक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी धांदल उडाली.
मनपा व प्रशासनाकडून नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने काल रात्रीपासूनच खबरदारीचा उपाय म्हणून बाधित भागातील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याची कारवाई वेगाने सुरू केली आहे. बॅक वॉटरची पातळी वाढत असल्याने पुढील काही तासांत परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.
वर्धा नदीचा पूल पाण्याखाली; दक्षिण भारताकडे जाणारी वाहतूक ठप्प
दरम्यान, वर्धा नदीने पात्र सोडल्याने चंद्रपूर ते राजुरा मार्गे तेलंगणा आणि दक्षिण भारताला जोडणारा वर्धा नदीचा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. पुलावरून सुमारे २ फूट पुराचे पाणी वाहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने काल रात्रीपासूनच हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.
रस्ता बंद झाल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला तेलंगणा व दक्षिण भारताच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला असून, नदीची पाणी पातळी ओसरेपर्यंत हा मार्ग बंदच राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






