Chandrapur Ancient Village संशोधनातून सापडलेले प्राचीन अवशेष

Chandrapur Ancient Village । संशोधनातून उलगडले चंद्रपूरचे मूळ ‘बोर’ गाव; १० हजार वर्षांपूर्वीच्या अवशेषांचा शोध

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 2, 2026

Chandrapur Ancient Village : चंद्रपूर: चंद्रपूर शहराचा इतिहास केवळ गोंड राजांपुरता मर्यादित नसून, ते ५० हजार वर्षांपूर्वीच्या पाषाणयुगीन आदिमानवाचे मुख्य केंद्र होते, हे एका ताज्या संशोधनातून समोर आले आहे. चंद्रपूर येथील प्रसिद्ध इतिहास अभ्यासक आणि संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी इराई आणि झरपट नदीच्या संगमाजवळ, पूर क्षेत्राच्या बाहेर एका अत्यंत प्राचीन आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या गावाचा शोध लावला आहे. ‘बोर’ (सध्याचे बोर रिठ) असे या नष्ट झालेल्या मूळ गावाचे नाव आहे. (चंद्रपूर-वर्धा व गडचिरोली जिल्ह्यातील विधानपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरु)

या गाबाच्या परिसरात प्रा. चोपणे यांना तब्बल १० हजार वर्षांपूर्वीची पाषाणयुगीन अवजारे, ३ हजार वर्षांपूर्वीच्या दगडाच्या वस्तू, २ हजार वर्षांपूर्वीची मडकी, प्राण्यांची हाडे, दात आणि लोह वितळवण्याच्या भट्टीचे अवशेष आढळले आहेत. यावरून हे गाव सातवाहन, वाकाटक आणि यादव अशा विविध कालखंडांचे साक्षीदार असल्याचे सिद्ध होते. स्थानिक शेतकरी याला ‘गवळी गाव’ समजत असले, तरी संशोधनातून याचे प्राचीनत्व उघड झाले आहे. येथे पूर्वी एक भव्य मंदिर होते, ज्याचे दोन शिवलिंग आणि इतर अवशेष आजही विखुरलेले आहेत. काही वर्षांपूर्वी येथे प्राचीन नाणी आणि अलंकारही सापडले होते. सध्या घरांचे अवशेष ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने तिथे टेकडी तयार झाली असून, अधिक उत्खनन केल्यास मोठे ऐतिहासिक पुरावे हाती लागू शकतात, असा विश्वास प्रा. चोपणे यांनी व्यक्त केला आहे.

Chandrapur Ancient Village मधून कोणते पुरावे समोर आले?

नद्यांच्या काठी बहरली संस्कृती

प्राचीन काळी बारमाही नद्यांच्या शेजारीच मानवी वस्त्या वसल्या होत्या. आजच्या चंद्रपूर शहराच्या इतिहासात इराई आणि झरपट नद्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.

  • पाषाणयुगीन वस्ती: दाताळा, नागाळा, देवाडा आणि आरवट हे क्षेत्र देशातील सर्वात मोठे पाषाणयुगीन स्थळ आहे. यानंतर झरपट नदीजवळील पापामिया टेकडी (सध्याचे मेडिकल कॉलेज परिसर) हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पाषाणयुगीन स्थळ असून, तिथे शिवलिंग आणि हत्तीचे शिल्प सापडले आहे.
  • प्राचीन गावे: इराई नदीजवळ आजच्या आरवट गावाजवळ, होमिओपॅथी कॉलेज परिसर आणि पठाणपुरा गेटपासून अवघ्या १.२ किमी अंतरावर हे ‘बोर रिठ’ गाव आहे. याशिवाय संगमाजवळ ‘माना’ नावाचे गाव होते. आजचे लालपेठ आणि बाबूपेठ म्हणजेच हिंदू काळातील ‘लोकपूर’ आणि ‘इंदूूपूर’ असावे, असा अंदाज आहे. गोंड राजांच्या पूर्वकाळात भद्रावती आणि भटाडा ही मोठी व्यापारी केंद्रे होती.

सातवाहन ते ब्रिटिश काळ

प्रा. सुरेश चोपणे यांच्या मते, चंद्रपूरच्या परिसरातील प्राचीन गावांवर अनुक्रमे सातवाहन, वाकाटक आणि यादव राजांचा प्रभाव होता. त्यानंतर इसवी सन १० व्या शतकानंतर वणी आणि चांदा (चंद्रपूर) परिसरातील ‘राजगोंड’ समाजाने आपली सत्ता स्थापन केली. ही सत्ता शिरपूर, बल्लारपूर ते चंद्रपूर अशी विस्तारत गेली. पुढे नागपूरच्या भोसले राजांनी आणि शेवटी इंग्रजांनी चंद्रपूरवर राज्य करत शहराचा विकास केला.

“जरी आजचा ज्ञात इतिहास गोंड राजे, भोसले आणि ब्रिटिश काळापासून सुरू होत असला, तरी उपलब्ध पुराव्यांवरून चंद्रपूर शहराचे सर्वात प्राचीन आणि मूळ गाव हे ‘बोर रिठ’ हेच होते, हे आता स्पष्ट झाले आहे.”

– प्रा. सुरेश चोपणे, इतिहास अभ्यासक व संशोधक, चंद्रपूर.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “Chandrapur Ancient Village । संशोधनातून उलगडले चंद्रपूरचे मूळ ‘बोर’ गाव; १० हजार वर्षांपूर्वीच्या अवशेषांचा शोध”

  1. गोंड राजाच्या आधी चंद्रपूर आणि भद्रावती वर कोणत्या लोकांचे राज्य होते हे यांनी सांगितले नाही.
    सरळ सरळ इतिहासाची कादंबरी करणारे लोक इतिहासकार बनत आहेत. सोयीचा इतिहास लिहिल्या जात आहे.
    असो

    Reply

Leave a Comment