LTT Ballarshah Express : चंद्रपूर : चंद्रपूर, बल्लारशाह आणि संपूर्ण विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस – बल्लारशाह एक्सप्रेस (२०१०७/२०१०८) या महत्त्वाच्या रेल्वे सेवेला अतिरिक्त फेरीची मंजुरी देत रेल्वे बोर्डाने हिरवा कंदील दाखविला आहे. राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत दिल्ली येथे झालेल्या बैठकीत या रेल्वे सेवेसाठी अतिरिक्त फेरीची आग्रही मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याने सध्या आठवड्यातून एकदा धावणारी ही रेल्वे आता आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे. या निर्णयाबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले असून विदर्भातील प्रवाशांच्या हितासाठी रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या सकारात्मक निर्णयाचे स्वागत केले आहे. (विधानपरिषद निवडणूक, चंद्रपुरात तीन उमेदवारांचे अर्ज दाखल)
LTT Ballarshah Express च्या अतिरिक्त फेरीमुळे कोणाला फायदा?
लोकमान्य टिळक – बल्लारशाह एक्सप्रेसला यापूर्वी मंजुरी मिळाली होती आणि ती आठवड्यातून एकदा धावणार होती. मात्र, कार्यालयीन कामकाज, व्यावसायिक, वैद्यकीय उपचार तसेच इतर महत्त्वाच्या कारणांसाठी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना अधिक सोयीस्कर रेल्वे सेवेची गरज होती. ही बाब लक्षात घेऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे अतिरिक्त फेरी मंजूर करण्याची आग्रही मागणी केली होती.रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या आदेशानुसार २०१०७ लोकमान्य टिळक – बल्लारशाह एक्सप्रेस गुरुवारसोबत आता रविवारीही धावणार आहे. तसेच २०१०८ बल्लारशाह – लोकमान्य टिळक एक्सप्रेस शुक्रवारसोबत सोमवारीही धावणार आहे.
मुंबई, नाशिक, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि बल्लारशाह परिसरातील हजारो प्रवाशांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. व्यवसाय, शिक्षण, नोकरी तसेच वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा अधिक उपयुक्त ठरणार आहे. बल्लारशाह – मुंबई (वर्धा मार्गे) या मार्गावरील प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ही मागणी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे लावून धरली होती.
विदर्भातील रेल्वे सुविधांचा विस्तार आणि प्रवाशांच्या सोयीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार सातत्याने पाठपुरावा करीत असून लोकमान्य टिळक – बल्लारशाह एक्सप्रेसला मिळालेली अतिरिक्त फेरी हा त्या प्रयत्नांचा आणखी एक महत्त्वपूर्ण परिणाम असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नागरिकांनी याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






