Ballarshah Howrah Direct Train News34 Update

बल्लारशाह ते हावडा थेट रेल्वे सेवा सुरू करा; खासदार प्रतिभा धानोरकरांच्या पत्रावर रेल्वेमंत्र्यांचा प्रतिसाद!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 22, 2026

चंद्रपूर : Ballarshah Howrah Direct Train सुरू करण्याबाबत महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ही मागणी केली होती. या पत्राची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्र्यांनी चौकशी व आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. यामुळे चंद्रपूर परिसरातील लाखो प्रवाशांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (चंद्रपूर पोलिसांचे सुरक्षा मंत्र)

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बल्लारशाह येथून हावडा (कोलकाता) साठी थेट रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे पत्र क्र. २२७५/२०२६, दिनांक ३० जून २०२६ आग्रही मागणी केली होती. या मागणीची तात्काळ गंभीर दखल घेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्राद्वारे संदर्भ: MR/A/4080/2026, दिनांक ७ जुलै २०२६ या विषयावर चौकशी व आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

चंद्रपूर, गडचिरोली व कागजनगर परिसरातील लाखो नागरिकांची, विशेषत, बंगाली समाजाची गेल्या ६० वर्षांपासून चंद्रपूर-बल्लारशाह ते हावडा अशी थेट रेल्वे सेवा सुरू करण्याची जुनी व रास्त मागणी आहे. सध्या थेट रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्याने या भागातील प्रवाशांना, व्यापाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना हावडा गाठण्यासाठी सुमारे १६० किमी दूर असलेल्या नागपूर किंवा गोंदिया स्थानकावर जावे लागते. यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बल्लारशाह – चांदा फोर्ट – मूल – वडसा मार्गाने हावडासाठी नवीन गाडी सुरू करण्यात यावी अथवा सध्या सुरू असलेल्या चेन्नई-बिलासपूर एक्सप्रेस गाडी क्र. १२८५२ चा विस्तार हावडापर्यंत करण्यात यावा, या मागण्या केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे मांडल्या होत्या. या पत्राची दखल घेत रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मक पावले उचलली जात असून, सदर विषयाची पडताळणी करून आवश्यक ती धोरणात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी कळवले आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे चंद्रपूर व परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या आशा पल्लवित झाल्या असून, लवकरच हावडा व मुंबई प्रवासासाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment