Sudhir Mungantiwar Chandrapur Flood relief letter to CM

चंद्रपूर पूरबाधितांना मिळणार भरपाई; मुनगंटीवार धावले मदतीला

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 2, 2026

चंद्रपूर – Sudhir Mungantiwar Chandrapur Flood बाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटात पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने पुढाकार घेतला आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. तसेच बाधितांना नुकसानभरपाई अदा करण्याची आग्रही मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. (हे हि वाचा – सायबर गुन्हे व अंमली पदार्थावर कडक कारवाई करा – गृहराज्यमंत्री पंकज भोयर)

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल), अतिरिक्त मुख्य सचिव (मदत व पुनर्वसन) तसेच मुख्य सचिव आणि महसूल आयुक्त (नागपूर) यांना पत्र पाठवून चंद्रपूर जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती देत नुकसान भरपाई देण्यासंदर्भाची मागणी केली आहे. यासोबतच चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

वर्धा व इरई नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत

पत्रात आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे की, सलग चार दिवसांच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पाण्याखाली गेली असून उभी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी घरे, गोठे, शेतबांध, रस्ते व इतर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. वर्धा आणि इरई नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरून शेतीसह गावांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने तातडीने संयुक्त पाहणी करून नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावेत आणि शासनाच्या नियमांनुसार नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना त्वरित आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई अदा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याशिवाय, ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्या भागांसाठी विशेष मदत जाहीर करून अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचीही आ.मुनगंटीवार यांनी मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी व नागरिकांना तातडीने दिलासा मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच शासनाने या गंभीर परिस्थितीची संवेदनशीलतेने दखल घेऊन तातडीने आवश्यक निर्णय घ्यावेत, असे पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, या संकटाच्या काळात एकही शेतकरी किंवा नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट करत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गावागावात जाऊन नुकसानग्रस्तांना मदत करावी, प्रशासनाला पंचनाम्यांसाठी सहकार्य करावे आणि पात्र लाभार्थ्यांचे नुकसान शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना लवकरात लवकर न्याय मिळेल, नुकसानभरपाईची प्रक्रिया गतिमान होईल आणि संकटग्रस्त कुटुंबांना त्वरित दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment