चंद्रपूर दुष्काळ पंचनामे अंतर्गत वलनी येथे अधिकारी नुकसानग्रस्त धान पिकाची पाहणी करताना

चंद्रपूर दुष्काळ पंचनामे सुरू : 17 हजार हेक्टरवरील खरीप पिकांची पाहणी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 30, 2026

चंद्रपूर – चंद्रपूर दुष्काळ पंचनामे प्रक्रिया तालुक्यात सुरू करण्यात आली आहे. शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत चंद्रपूर तालुक्याचा समावेश झाल्यानंतर खरीप पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू झाले. तालुक्यात खरीप हंगामात सुमारे 17 हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड झाली होती. या क्षेत्रातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे केले जाणार आहेत.

पंचनामे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांच्यामार्फत संयुक्तरीत्या होत आहेत. शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण होईल. वलनी येथे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी नुकसानग्रस्त धान पिकाची पाहणी केली. कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये, असा उद्देश आहे. (बालकांसाठी मोफत इको शिबीर, वाचा महत्वाची बातमी)

याच अनुषंगाने वलनी येथील शेतकरी संतोष आत्राम यांच्या शेतामधील नुकसानग्रस्त धान पिकाची पाहणी चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार ओंकार ठाकरे, तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने, मंडळ अधिकारी विशाल कुरेवार, तलाठी रमेश झिटे, पोलिस पाटील अशोक मेश्राम पोलीस पाटील, ई-पीक पाहणी सर्व्हेअर विशाल गेडाम यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी सुखदेव पेंदराम, वनपाल गेडाम, रोहित पेंद्राम हे शेतकरी सुध्दा उपस्थित होते.

चंद्रपूर दुष्काळ पंचनामे कसे होणार?

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद व्हावी, कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये आणि शासनाला अचूक माहिती उपलब्ध व्हावी, या दृष्टीने महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाच्या समन्वयातून ही कार्यवाही राबविण्यात येत आहे. शेतपिकांचे पंचनामे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांच्यामार्फत संयुक्तरीत्या करण्यात येत आहेत. संबंधित पथक प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी करणार असून, शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सर्वेक्षण व पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

11 पथक प्रमुखांकडून कामावर नियंत्रण : पंचनाम्याचे काम नियोजनबद्ध व गतीने पूर्ण करण्यासाठी चंद्रपूर तालुक्यात एकूण 11 पथक प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळ अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे पथक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली संबंधित गावांमध्ये संयुक्त पथकांमार्फत शेतपिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करण्यात येणार आहेत. पंचनाम्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता राहावी, प्रत्यक्ष नुकसानाची योग्य नोंद व्हावी तसेच पात्र शेतकऱ्यांची माहिती अचूकपणे संकलित व्हावी, यासाठी पंचनामे करताना संबंधित शेतकऱ्यांची उपस्थिती सुनिश्चित करण्यात येणार आहे. सर्वेक्षणादरम्यान पिकांची सद्यस्थिती व नुकसान याबाबत आवश्यक माहिती नोंदविण्यात येईल.

पंचनाम्यांच्या याद्या चावडीवर प्रसिद्ध होणार : संयुक्त पथकांमार्फत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर तयार करण्यात आलेल्या याद्या संबंधित गावाच्या चावडीवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पंचनाम्यामध्ये आपल्या नुकसानीची नोंद झाली आहे किंवा नाही, याची माहिती ग्रामस्तरावरच उपलब्ध होणार आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment