चंद्रपूर दुष्काळग्रस्त तालुके यादीतून वगळलेले बल्लारपूर, ब्रह्मपुरी, जिवती

बल्लारपूर, ब्रह्मपुरी, जिवती दुष्काळग्रस्त यादीतून वगळले; समावेशाची मागणी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 27, 2026

चंद्रपूर : चंद्रपूर दुष्काळग्रस्त तालुके यादीतून बल्लारपूर, ब्रह्मपुरी आणि जिवती या तीन तालुक्यांना वगळण्यात आले आहे. खरीप हंगाम २०२६ अंतर्गत या तीन तालुक्यांचा तातडीने समावेश करावा, अशी मागणी काँग्रेस नेते व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिनेश दादाजी चोखारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत केला असून, उर्वरित तीन तालुक्यांतील शेतकरी सवलतींपासून वंचित राहत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. (मूल उपजिल्हा रुग्णालयात डायलेसिस केंद्राचे लोकार्पण, वाचा रुग्ण सेवेची बातमी)

चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगामात पावसाची अनिश्चितता, पर्जन्यमानातील तफावत, पिकांची चिंताजनक स्थिती आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अनेक भागांत पिकांच्या वाढीवर व उत्पादनक्षमतेवर प्रतिकूल परिणाम झाला असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत असल्याचे चोखारे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

राज्य शासनाने खरीप २०२६ अंतर्गत Trigger-1 लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश केला आहे. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही आणि पोंभूर्णा या १२ तालुक्यांचा समावेश आहे. मात्र बल्लारपूर, ब्रह्मपुरी आणि जिवती हे तीन तालुके या यादीतून वगळण्यात आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील भौगोलिक, हवामानविषयक आणि कृषी परिस्थितीचा विचार करता सर्व तालुक्यांतील शेतकरी नैसर्गिक संकटाला सामोरे जात असल्याने तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांना दुष्काळी सवलतींपासून वंचित ठेवणे आर्थिकदृष्ट्या गंभीर ठरू शकते, असे चोखारे यांनी म्हटले आहे.

दुष्काळग्रस्त तालुक्यांना लागू असलेल्या विविध सवलतींमध्ये कृषीपंपांच्या वीजबिलासंदर्भातील सवलती, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कातील सवलत तसेच शासन निर्णयानुसार उपलब्ध होणाऱ्या इतर मदत व सवलतींचा समावेश आहे. त्यामुळे बल्लारपूर, ब्रह्मपुरी आणि जिवतीतील पात्र शेतकरी व नागरिकांनाही या सवलतींचा लाभ मिळणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

चंद्रपूर दुष्काळग्रस्त तालुके : प्रत्यक्ष पाहणीची मागणी

या तीन तालुक्यांतील पर्जन्यमान, पीक परिस्थिती, पेरणी क्षेत्र, पीक नुकसान, उपलब्ध पाणीसाठा, भूजलस्थिती आणि इतर संबंधित निकषांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

बल्लारपूर, ब्रह्मपुरी आणि जिवती या तीन तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून तेथील पात्र शेतकरी व नागरिकांना दुष्काळी सवलतींचा लाभ द्यावा. कृषीपंपांच्या वीजबिलातील सवलत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कातील सवलत तसेच शासन नियमानुसार उपलब्ध होणारी आर्थिक मदत व इतर सहाय्य या तालुक्यांनाही लागू करावे, अशी मागणी चोखारे यांनी केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना समान निकषांनुसार दुष्काळी मदत व सवलतींचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासकीय निकषांचा वस्तुनिष्ठ पुनर्विचार करून उर्वरित तीन तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत तातडीने समावेश करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी दिनेश चोखारे यांनी केली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment