Sawali Tiger Attack Death घटनास्थळी वनविभाग व पोलीस पथकाची पाहणी

सावलीत वाघाचा हल्ला; जिल्ह्यातील ३१वा बळी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 22, 2026

सावली : Sawali Tiger Attack Death सावली तालुक्यातील सामदा बुज परिसरात २१ सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. म्हशी चारण्यासाठी जंगलात गेलेल्या हेमंत अशोक भुरसे या शेतकऱ्यावर वाघाने अचानक हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. या परिसरातील वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षातील हा तब्बल ३१ वा बळी ठरला असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र शोककळा आणि संतापाची लाट पसरली आहे. (हे हि वाचा – शाळेजवळ वाघाचा हल्ला)

Sawali Tiger Attack Death: सामदा बुजमध्ये नेमके काय घडले

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, हेमंत भुरसे हे रोजच्या सवयीप्रमाणे दुपारी आपल्या म्हशी घेऊन गावाशेजारील जंगल परिसरात गेले होते. मात्र सायंकाळ उलटून गेली तरी ते घराकडे परतले नाहीत. यामुळे चिंतेत पडलेल्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी जंगल परिसरात त्यांची शोधाशोध सुरू केली. या शोधमोहीमेदरम्यान जंगलामध्ये हेमंत यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. शरीरावरील गंभीर जखमांवरून वाघाच्या हल्ल्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.

शोधमोहिमेदरम्यान रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

घटनेची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच सामदा बुजसह आसपासच्या गावांतील शेकडो नागरिक घटनास्थळी जमा झाले. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा मुक्त संचार वाढला असूनही वनविभागाने वेळेत योग्य पावले उचलली नाहीत, असा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला. पोटापाण्यासाठी रोज शेतावर आणि जंगलाच्या सीमेवर जावे लागते, पण आता जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे, आज हेमंत गेला उद्या कोणाचा नंबर असा उद्विग्न सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.

ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत हल्ला करणाऱ्या वाघाचा तात्काळ शोध घेऊन त्याला जेरबंद करावे आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे, अशी मागणी केली आहे. यासोबतच मृतक हेमंत भुरसे यांच्या कुटुंबाला शासनाकडून तातडीने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची, गावात वनविभागाची २४ तास गस्त वाढवण्याची आणि परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्याची जोरदार मागणी केली.

घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस ठाण्याचे पथक आणि वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर कार्यवाही आणि तपासाला सुरुवात केली आहे. लागोपाठ घडणाऱ्या अशा जीवघेण्या घटनांमुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण असून, मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी वनविभाग आता तरी ठोस आणि प्रभावी उपाययोजना करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment