सावली जातीवाचक अपमान प्रकरण: सावली पोलीस ठाण्याची प्रतिकात्मक प्रतिमा

सावली जातीवाचक अपमान प्रकरण: बोथलीत शारदा मंडळातील वाद पोलिसांत, तीन महिलांवर गुन्हा दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 7, 2026

सावली – सावली जातीवाचक अपमान प्रकरण आता पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोथली येथे शारदा उत्सवादरम्यान जातीवरून भेदभाव आणि सार्वजनिक ठिकाणी अपमान झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सौ. मिनाक्षी पोवरे यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा नोंदवला गेला. पोलीस उपनिरीक्षक सचिन मुसले पुढील तपास करत आहेत. (बार बांधकामाच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी ३ लाखांची लाच, वाचा बातमी)

चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा बोथली येथे जात संदर्भावरून झालेल्या भेदभावामुळे आणि सार्वजनिक ठिकाणी अवमान केल्याप्रकरणी एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी सावली पोलिसांनी तीन महिला विरोधात विविध गंभीर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सावली जातीवाचक अपमान प्रकरण: शारदा उत्सवात स्वयंपाकावरून नाराजी

प्राप्त माहितीनुसार, बोथली येथील सौ. मिनाक्षी बापुजी पोवरे यांनी सावली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गेल्या वर्षी सावली परिसरातील वॉर्ड क्रमांक ०२ मध्ये काही महिलांनी एकत्र येऊन संयुक्त शारदा महिला मंडळाची स्थापना केली होती, ज्यामध्ये फिर्यादी महिलांसोबतच मातंग समाजातील इतर महिलांनीही सहभागी होऊन शारदा उत्सव अत्यंत आनंदात साजरा केला होता. याच धर्तीवर यावर्षीही वॉर्डमध्ये शारदा देवीची स्थापना करण्यात आली होती आणि नेहमीप्रमाणे समाजातील महिलांनी वर्गणी गोळा करण्यापासून ते इतर कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. वादाची ठिणगी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी पडली, जेव्हा संयुक्त शारदा महिला मंडळाकडून जेवणाचे आयोजन करण्यात आले होते.

सावली जातीवाचक अपमान प्रकरण – फिर्यादी मिनाक्षी पोवरे यांच्यासह इतर महिला स्वयंपाक बनवण्यासाठी गेल्या असता, त्यांना जाणूनबुजून कणिक मळण्यापासून, भाजी कापण्यापासून आणि पोळ्या बनवण्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. असे असले तरी आनंदाचा दिवस असल्याने त्या वेळी त्यांनी कोणतीही वाच्यता केली नाही आणि मंडळाच्या सांगण्यानुसार तांदूळ व लाह्या साफ करण्याचे काम पूर्ण केले. पुढे २४ ऑक्टोबर २०२६ रोजी देवीचे विसर्जन पार पडले आणि त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी मंडळाचा हिशोब करण्यासाठी देवीच्या समोरील रस्त्यावर एक बैठक बोलावण्यात आली होती.

मंडळाच्या बैठकीतील आरोप, सावली जातीवाचक अपमान प्रकरण

या बैठकीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सुमारे ३० ते ३५ महिला उपस्थित असताना, फिर्यादीने आमच्या बाबतीत असा भेदभाव केला जात असेल तर आम्ही मंडळात राहणार नाही, अशी भूमिका मांडली. त्यावर कौशल्या अरुण सुरपाम हिने त्यांना न राहण्याबाबत बोलून वर्गणी मागितली, तर कुसुम पेंदोर हिने “तुम्ही हात लावला तर बाकी बाया मानस खात नाही, आमचं अन्न वाया घालू का?” असे म्हटले. तसेच बेबीबाई चंद्राशा पेंदोर हिने देखील तुमच्या समाजाच्या महिलांनी स्वयंपाक बनवला तर बाकी लोक जेवायला येत नाहीत आणि वर्गणी देत नाहीत, असे बोलून समाजाचा अपमान केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल? सावली जातीवाचक अपमान प्रकरण

हा जाणीवपूर्वक जातीवरून करण्यात आलेला अपमान इथेच थांबला नाही, तर २८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सारिका निरुडवार आणि शिवानी निरुडवार यांच्यात कोणत्यातरी कारणावरून भांडण झाले. ते भांडण शांत झाल्यानंतर शिवानी स्वप्नील निरुडवार हिने नरेश आलम यांच्या घरासमोर येऊन मातंग समाजाबद्दल अत्यंत अपमानास्पद, हीन व जातीवाचक भाषेत शिवीगाळ करत सार्वजनिक ठिकाणी समाजाचा पाणउतारा केला.

पोलीस तपास आणि पुढील कार्यवाही, सावली जातीवाचक अपमान प्रकरण

अनुसूचित जातीच्या असल्याचे माहीत असूनही सार्वजनिक ठिकाणी जाणीवपूर्वक हीन वागणूक देऊन अस्पृश्यतेच्या कारणावरून अपमान केल्याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तोंडी तक्रारीवरून सावली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी सावली पोलिसांनी शिवानी स्वप्नील निरुडवार, बेबीबाई चंद्राशा पेंदोर आणि कुसुम रतनशा पेंदोर या तीन महिलांविरोधात नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ च्या कलम ७(१)(ड) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ च्या कलम ३(१)(र) नुसार गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन विनायक मुसले हे करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “सावली जातीवाचक अपमान प्रकरण: बोथलीत शारदा मंडळातील वाद पोलिसांत, तीन महिलांवर गुन्हा दाखल”

Leave a Comment