Brahmapuri Bar Theft Spot Investigation Police

ब्रम्हपुरी येथे उज्वल बार फोडले: २ लाखांची दारू लंपास

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 27, 2026

ब्रम्हपुरी: Brahmapuri Bar Theft प्रकरणी ब्रम्हपुरी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. खरकाळा फाटा येथील उज्वल बार अँन्ड रेस्टॉरेंटमध्ये अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून आत प्रवेश केला. आषाढी एकादशीच्या दिवशी बार बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. या घटनेत २ लाख १३ हजार २२७ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. यामध्ये रोकड, महागडी दारू आणि टीव्हीचा समावेश आहे. पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. (हे हि वाचा – वरोऱ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड)

मिळालेल्या माहितीनुसार, रुई (पोस्ट निलज, ता. ब्रम्हपुरी) येथील रहिवासी अमित दादाजी बनकर यांचा मौजा रुई शिवारात खरकाळा फाटा येथे परवानाधारक ‘उज्वल बार अँन्ड रेस्टॉरेंट’ आहे. २५ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशीचा सण असल्याने हा बार दिवसभर पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. बनकर हे आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसह बाहेर फिरण्यासाठी गेले होते. रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांनी बारबाहेरून पाहणी केली असता सर्व काही सुव्यवस्थित दिसत होते.

आषाढी एकादशीच्या दिवशी बारमध्ये घरफोडी

मात्र, दुसऱ्या दिवशी २६ जुलै रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अमित बनकर यांचे भाऊ अतिश बनकर हे कामानिमित्त बारजवळ गेले असता, त्यांना इमारतीचे मागचे दोन्ही शटर अर्धवट उघडे असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने बारचे मॅनेजर अश्विन टेंभुर्णे आणि अमित बनकर यांना फोन करून याबद्दल माहिती दिली. सर्वजण घटनास्थळी पोहोचले आणि समोरचे शटर उघडून आत प्रवेश केला असता काउंटरमधील सामान पूर्णपणे अस्ताव्यस्त पडलेले आढळले.

चोरट्यांनी मागचे शटर तोडून बारमध्ये प्रवेश करत मॅग्नम, हॉर्वड, कासबर्ग आणि बडवायजर कंपनीच्या बिअरच्या बाटल्या व कॅन, तसेच रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, मॅकडोवेल्स नंबर १, ब्लेंडर्स प्राइड, ग्लेन वॉकमध्ये मिळून हजारो रुपयांची देशी-विदेशी दारू लंपास केली. याशिवाय काउंटरमध्ये ठेवलेले ३२ इंचाचे बुश कंपनीचे टीव्ही आणि काउंटरमधील ११,००० रुपयांची रोख रक्कम असा एकूण २,१३,२२७ रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.

या घटनेनंतर अमित बनकर यांनी तातडीने ब्रम्हपुरी पोलिसांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०५(a) आणि ३३१(४) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी प्रमोद गोविंदराव बनबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज दादाराव खडसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment