ब्रम्हपुरी : (brahmapuri bar burglary case) अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. मौजा अड्याळ फाटा नागभीड रोड परिसरातील ‘मधुशाला बार अँड रेस्टॉरंट’मध्ये अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बारमधील तब्बल १ लाख ३१ हजार ८०५ रुपये किमतीच्या विदेशी दारू आणि बिअरच्या बॉटल्स, तसेच संगणक व काउंटरमधील रोख रकमेसह एकूण १ लाख ६६ हजार ८०५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. बार मालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
brahmapuri bar burglary case : नागभीड रोडवरील हॉटेलमध्ये चोरट्यांचा डल्ला
या घटनेची सविस्तर हकिगत अशी की, तक्रारदार शंतनु बगमारे हे अड्याळ टेकडी फाटा येथे स्वतःच्या मालकीचा ‘मधुशाला बार अँड रेस्टॉरंट’ नावाचा परवानाधारक विदेशी मद्यविक्रीचा व्यवसाय चालवतात. दररोज प्रमाणे १६ जुलै रोजी सकाळी १० वाजता त्यांनी बार सुरू केला होता. दिवसभर मॅनेजर आशय सोनावणे आणि तीन वेटर्सच्या समवेत व्यवसाय आटोपून रात्री १० वाजताच्या सुमारास बारचे शटर व्यवस्थित लॉक करून सर्वजण आपापल्या घरी निघून गेले होते.
(हे हि वाचा – अवैध सावकारांवर छापा, कोरे चेक जप्त)
दुसऱ्या दिवशी म्हणजेच १७ जुलै रोजी सकाळी ९:१५ वाजताच्या सुमारास बारचा वेटर प्रितम सहारे हा कामावर आला असता, त्याला बारच्या शटरचे दोन्ही लॉक तुटलेल्या अवस्थेत दिसले. त्याने तातडीने मालक शंतनु बगमारे यांना मोबाईलवरून कॉल करून याची माहिती दिली आणि व्हिडिओ कॉलद्वारे शटर थोडे वर करून आतील दृश्य दाखवले. व्हिडिओ कॉलमध्ये बारचे काउंटर आणि फ्रीज पूर्णपणे रिकामे दिसत होते, तसेच बारमधील वीज मीटरची ट्रिप पाडलेली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशाही वरच्या बाजूला वळवून ठेवलेली आढळून आली.
बारमध्ये चोरी झाल्याची खात्री पटताच शंतनु बगमारे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांच्या उपस्थितीत बारचे शटर वर करून आत पाहणी केली असता, काउंटर आणि फ्रीजमधील मद्यसाठा गायब असल्याचे स्पष्ट झाले. चोरट्यांनी नियोजनबद्ध रीतीने आर. एस., नंबर १ व्हिस्की, आयकोनीक व्हाईट, आर. सी., ओकस्मिथ सिल्व्हर, रॉयल ग्रीन, ग्रीन लेबल, मॅजिक मुमेंट, ग्रँड मास्टर, ब्लेंडर्स प्राईड, डायनामाईट, सिग्नेचर, ओल्ड माँक, बकार्डी, मास्टर डिलाईट, ऑल सीजन, स्टोरी नाईन, सह्याद्री, ब्राउन मॅन, ब्लॅक लेबल आणि रेड लेबल अशा विविध नामांकित कंपन्यांच्या विदेशी दारूच्या शेकडो बॉटल्स तसेच टुबर्ग, हायवर्ड, किंगफिशर, बडवायझर व लंडन पिल्सनर कंपन्यांच्या ८५ बिअरच्या बॉटल्स चोरून नेल्या.
याशिवाय काउंटरमधील २,००० रुपयांची रोख रक्कम, २०,००0 रुपये किमतीचा संगणक (सीपीयू, मॉनिटर, माऊस, कीबोर्ड), ५,००0 रुपयांचा प्रिंटर आणि ८,००0 रुपयांचा इनव्हर्टर असा एकूण १ लाख ६६ हजार ८०५ रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०५(a) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, ठाणे प्रभारी अधिकारी प्रमोद गोविंदराव बनबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनराज ओमनराव सेलोकर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






