Bramhapuri Bar Theft Gang arrested by Chandrapur Police

ब्रम्हपुरीत २ बार फोडणारी नागभिडची टोळी गजाआड; १६ लाखांच्या वाहनांसह

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 4, 2026

ब्रम्हपुरी (चंद्रपूर): Bramhapuri Bar Theft Gang प्रकरणाचा ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने यशस्वी पर्दाफाश केला आहे. ब्रम्हपुरी परिसरातील दोन बारचे शटर वाकवून विदेशी दारू व साहित्य लांबवणाऱ्या नागभिड तालुक्यातील चार सराईत आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

या कारवाईत गुन्ह्यात वापरलेली बोलेरो, बलेनो व एस-प्रेसो कार आणि चोरलेली विदेशी दारू असा एकूण १६ लाख रुपयांहून अधिक मूल्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (हे हि वाचा – टाटा शोरूम मध्ये चोरी, एलसीबी ने केली अटक)

कॅमेरे बंद करून चोरी; चोऱ्यांची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १७ जुलै २०२६ रोजी ब्रम्हपुरी येथील विद्यानगरचे रहिवासी फिर्यादी शंतनु प्रकाशराव बगमारे यांच्या मौजा अड्याळ येथील बारचे अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास शटर वाकवले. चोरांनी बारमध्ये प्रवेश करून विदेशी दारू व इतर साहित्य असा एकूण १ लाख ६६ हजार ८०५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

याप्रकरणी बगमारे यांच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) आणि ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात करण्यात आली होती. तपासादरम्यान पोलिसांनी बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोरांनी अत्यंत चाणाक्षीने कॅमेरे बंद करून चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते.

आठ दिवसांत दुसरी धाडसी घरफोडी; खरकाडा येथील बारचे शटर वाकवले

पहिल्या घटनेचा तपास सुरू असतानाच अवघ्या आठ दिवसांच्या आत चोरट्यांनी पोलिसांसमोर दुसरे आव्हान उभे केले. खरकाडा येथील अमित दादाजी बनकर यांच्या बारचे मागील शटर वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि २ लाख १३ हजार २२७ रुपयांची विदेशी दारू व साहित्य चोरून नेले. लागोपाठ घडलेल्या दोन मोठ्या चोऱ्यांमुळे ब्रम्हपुरी पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांची दोन वेगळी पथके तयार करण्यात आली. दोन्ही चोऱ्यांची पद्धत सारखीच असल्याने ही चोरी एकाच सराईत टोळीने केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.

नागभिड तालुक्यातील ४ आरोपींना अटक; गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई

गुन्हे शोध पथकाने अत्यंत कसोशीने, तांत्रिक दृष्टिकोनातून, तर्कशक्ती आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. पोलिसांनी संशयितांचा माग काढत नागभिड तालुक्यातील बामणी येथील सौरभ अनिल वाघाडे (वय २६), नागभिड येथील जगदिश दिपक शेंन्द्रे (वय २५), कुनघाडाचक येथील अभिषेक अशोक अलोने (वय २६) आणि मांगली अरब येथील विशाल दिवाकर ठाकरे (वय २३) या चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली.

चौकशीदरम्यान आरोपींनी दोन्ही चोऱ्यांची कबुली दिली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेली विदेशी दारू, साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त केली आहेत.

बोलेरो, बलेनो आणि एस-प्रेसो कारसह १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस कारवाईत ५ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी (क्र. MH 31 AR 5844), ६ लाख रुपये किमतीची निळ्या रंगाची मारुती सुझुकी बलेनो कार (क्र. MH 33 AD 1114) आणि ५ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी एस-प्रेसो कार (क्र. MH 34 BY 7585) अशा एकूण १६ लाख रुपयांहून अधिक मूल्याच्या वाहनांसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या अटकेमुळे ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन्ही बार फोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे करत आहेत.

स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण; पोलिसांचे विशेष कौतुक

ही धडाकेबाज कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झारकर आणि पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, पोलीस हवालदार मुकेश गजभे, मिलिंद नैताम तसेच पोलीस अंमलदार प्रविण भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान, स्वप्नील पळसपगार व वशिष्ट रंगारी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment