नागभिड (चंद्रपूर): नागभिड मोपेड फसवणूक प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्वस्त इलेक्ट्रीक स्कुटीचे आमिष दाखवून २ लाख ६६ हजार ९१८ रुपये घेतल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, भगतसिंग चौक परिसरात एक शोरूम सुरू करण्यात आले होते. तिथे बुकिंग आणि डाऊन पेमेंटच्या नावाखाली सुमारे ३०० जणांकडून रक्कम घेतली गेली. मात्र पैसे घेऊनही कोणालाही गाडीची डिलिव्हरी मिळाली नाही. ब्रम्हपुरीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे आलेल्या तक्रारीनंतर चौकशी होऊन गुन्हा नोंदवण्यात आला. (ट्र्क पेटविणारे ४ आरोपी अटकेत, वाचा बातमी)
डाॅ. अफरोज बशीरखान पठाण (रा. लाखनी, जि. भंडारा), संजय आसाराम कुथे (रा. लक्ष्मीनगर सुलेझरी, ता. नागभिड) आणि विक्रांत नंदकिशोर गजपुरे (रा. भगतसिंग चौक, नागभिड, जि. चंद्रपूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
नागभिड मोपेड फसवणूक : काय आहे नेमका प्रकार?
या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी सुरेश गजानन राउत (रा. मौशी, ता. नागभिड) यांनी यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रम्हपुरी यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. या तक्रारीनुसार, आरोपींनी संगनमत करून १२ जुलै २०२४ ते १२ मार्च २०२५ या कालावधीत नागभिड येथील भगतसिंग चौक परिसरातील विक्रांत गजपुरे यांचे टिनशेड भाड्याने घेतले. त्या ठिकाणी ‘TEHPG PRIVATE LIMITED AND ENTERPRISES, F.Y.R. EV SHOWROOM’ नावाचे इलेक्ट्रीक स्कुटी विक्रीचे शोरूम व कार्यालय सुरू करण्यात आले.
बुकिंग आणि डाऊन पेमेंटच्या नावाखाली रक्कम
या शोरूममध्ये आरोपी संजय कुथे आणि विक्रांत गजपुरे यांना मॅनेजर म्हणून ठेवण्यात आले होते. त्यांच्यामार्फत फिर्यादी व इतर ग्राहकांना ‘F.Y.R. EV’ कंपनीची दुचाकी मोपेड स्कुटी मार्केटमझ्ये स्कीम अंतर्गत स्वस्त दरात देण्याचे आमिष दाखवण्यात आले. नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी गाड्यांच्या बुकिंगपोटी प्रत्येकी १५०० ते २५०० रुपये तसेच डाऊन पेमेंटपोटी ७,५०० ते १०,००० रुपये स्वीकारण्यात आले. अशा प्रकारे फिर्यादी व इतर सुमारे ३०० लोकांकडून एकूण २ लाख ६६ हजार ९१८ रुपये गोळा करण्यात आले.
मात्र, पैसे घेऊनही आरोपींनी फिर्यादी व इतर साक्षीदारांना कोणत्याही इलेक्ट्रीक मोपेड स्कुटीची डिलिव्हरी दिली नाही आणि स्वीकारलेली रक्कम तसेच फायनान्सचे पैसे परस्पर लांबवून आर्थिक फसवणूक केली. या प्रकारामुळे नागरिकांची फसवणूक झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. वरिष्ठांच्या परवानगीने आणि चौकशी अहवालाच्या आधारावर नागभिड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३(५), ३१६(२) आणि ३१८(४) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल वेलहाळ डोंगरवार करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






