चंद्रपूर: चंद्रपूरमधील Chandrapur Share Trading Fraud शेअर ट्रेडिंगच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास दरमहा १० ते १५ टक्के आकर्षक परतावा व कमिशन देण्याचे आमिष दाखवून माय-लेकीनी ११ जणांची तब्बल १ कोटी ४४ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. याप्रकरणी चंद्रपूर रामनगर पोलिस ठाण्यात उमा पप्पू भट यांच्या तक्रारीवरून संशयित माय-लेकीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. निखिता बारई व कल्याणी दास अशी गुन्हा दाखल झालेल्या माय-लेकीची नावे असून, रामनगर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. (नाग मंदिर समोर हत्या, वाचा हि बातमी)
Chandrapur Share Trading Fraud: नेमकी तक्रार काय आहे?
तक्रारीनुसार, २०२४ मध्ये शेजारी राहणाऱ्या निखिता बारई हिने शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास दरमहा १० ते १५ टक्के कमिशन मिळेल असे सांगितले होते. सुरुवातीला गुंतवलेल्या रकमेवर काही काळ परतावा मिळाल्यामुळे तक्रारदाराचा तिच्यावर विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या तारखांना निखिता बारई हिला मोठी रक्कम देण्यास सुरुवात केली.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, २०२४ ते एप्रिल २०२६ दरम्यान त्यांनी विविध व्यवहारांच्या माध्यमातून सुमारे ५५ लाख रुपये निखिताला दिले. यामध्ये काही रक्कम रोख स्वरूपात होती, तर काही रक्कम बचत आणि सोन्यावर कर्ज काढून उभारण्यात आली होती. बँक खाती, यूपीआय व्यवहार आणि इतर कागदपत्रांच्या तपासणीनंतर मूळ रकमेचा उलगडा झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मार्च २०२६ पासून निखिता बारई हिने पैसे देणे बंद केले. रक्कम परत मागितली असता, संबंधित व्यक्तीचा अपघात झाल्यामुळे सध्या पैसे मिळत नसल्याचे आणि दोन महिन्यांनंतर पूर्ण रक्कम परत करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यानंतर परिसरातील इतर लोकांनीही तिच्याकडे रकमेची मागणी केली. त्यांना जून महिन्यात पैसे परत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र पैसे मिळाले नाहीत.
काही दिवसांनंतर निखिता बारई आपल्या मुलांसह घर सोडून निघून गेली. तिचा काहीच पत्ता न लागल्याने स्थानिक नागरिकांना आपल्यासोबतही आर्थिक फसवणूक झाल्याचा संशय आला. यानंतर इतर लोकांकडूनही अशाच प्रकारे रक्कम घेण्यात आल्याची माहिती समोर आली.
इतर १० जणांकडून ८९ लाखांचे व्यवहार
तक्रारीनुसार, सीमा संजय मुजुमदार यांच्याकडून १३.५० लाख, जयंती दिनेश दास यांच्याकडून ७ लाख, सुप्रिया नरेश यांच्याकडून ९ लाख, रेखा मनोज पॉल यांच्याकडून ७ लाख, श्रुती संजय दास यांच्याकडून ६ लाख, रोहित उर्फ पप्पू रणसिंग भट यांच्याकडून ११ लाख, शिवम कृष्ण शाहा यांच्याकडून ६.३० लाख, आदित्य मनोज मल्लकि यांच्याकडून २२.५० लाख, अजहर शेख यांच्याकडून ६ लाख आणि सचिन दिनेश दास यांच्याकडून ८२ हजार रुपये घेण्यात आले आहेत.
या लोकांकडून एकूण ८९ लाख १२ हजार रुपये घेण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारदाराचे सुमारे ५५ लाख रुपये मिळून एकूण रक्कम सुमारे १ कोटी ४४ लाख १२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी निखिता बारई आणि कल्याणी दास यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलीस बँक खाती, यूपीआय व्यवहार, इतर आर्थिक कागदपत्रे आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी करत असून, तपासानंतरच प्रत्यक्ष रक्कम आणि कथित फसवणुकीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






