चिमूर : नेरी आर्थिक फसवणूक प्रकरणात आरडी आणि एफडीच्या नावाखाली एका कापड व्यावसायिक महिला व तिच्या कुटुंबाकडून १ कोटी ५० लाख ८० हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. बनावट एफडी पावत्या दिल्याची तक्रार चिमूर पोलिसांत करण्यात आली. पोलिसांनी आशिष लक्ष्मण उरकुडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या दहा ते बारा वर्षांपासून जपलेला विश्वास, घरगुती व्यवहार हाताळण्याची जबाबदारी आणि परिचित चेहऱ्यावर ठेवलेला डोळेझाक भरवसा याचा गैरफायदा घेत एका तरुणाने कापड व्यावसायिक महिला व तिच्या कुटुंबाची तब्बल १ कोटी ५० लाख ८० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार चिमूर तालुक्यातील नेरी येथे उघडकीस आला आहे. आरडी आणि एफडीच्या नावाखाली पैसे घेऊन बनावट पावत्या दिल्याचे समोर आल्यानंतर चिमूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (मुलाने केली वडिलाची हत्या, शवविच्छेदन अहवालानंतर गुन्हा दाखल)
नेरी आर्थिक फसवणूक: आरडी-एफडीच्या नावाखाली पैसे घेतल्याचा आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार नुरी नसिरउल्लाह खान (वय ५५, रा. बाजार चौक, नेरी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर) या नेरी येथे ‘मेहंदी साडी सेंटर’ नावाने कापडाचे दुकान चालवितात. त्यांच्यासोबत मुलगी आरजू खान आणि मुलगा आमीर खान हे राहतात व व्यवसायात मदत करतात.
घरात कोणताही पुरुष सदस्य व्यावसायिक व्यवहारांसाठी उपलब्ध नसल्याने गावातीलच आशिष लक्ष्मण उरकुडे (वय ३०, रा. धनगर मोहल्ला, नेरी, ता. चिमूर) याच्याशी त्यांचा मागील १० ते १५ वर्षांपासून जिव्हाळ्याचा व व्यावहारिक संबंध होता. आशिष हा निवेदिता को-ऑपरेटिव्ह बँकेत आरडी एजंट म्हणून काम करीत असल्याची माहिती कुटुंबाला होती. त्यामुळे व्यवसायाचे अनेक व्यवहार व गुंतवणुकीची कामे त्याच्यामार्फत केली जात होती.
आशिषच्या सांगण्यावरून कुटुंबाने निवेदिता बँकेत आरडी सुरू केली आणि दुकानातून व बाजारातून जमा होणारी रक्कम त्याच्याकडे देण्यात येत होती; तसेच ती रक्कम एफडीमध्ये गुंतविल्याचे सांगून आशिष बँकेच्या पावत्या घरी आणून देत असे. कुटुंबातील कोणीही बँकेत चौकशीला गेल्यास आशिष त्यापूर्वीच तिथे पोहोचून जमा किंवा काढण्याचे व्यवहार स्वतः पूर्ण करून आणत असल्याने त्याच्यावर कधीही संशय आला नाही.
मागील १० ते १२ वर्षांत नुरी खान यांनी आपल्या दुकानातून रोख व इतर माध्यमातून एकूण ९९ लाख रुपये आशिषकडे दिले (ज्यामध्ये व्याजाची रक्कम समाविष्ट नाही). त्याबदल्यात विविध खाते व पावती क्रमांकांखाली २० एप्रिल २०२६ रोजी २ लाख, ६ जुलै २०२६ रोजी २ लाख, २६ सप्टेंबर २०२६ रोजी ४३ लाख आणि १३ डिसेंबर २०२५ रोजी ५२ लाख रुपयांच्या एफडी पावत्या देण्यात आल्या.
नेरी आर्थिक फसवणूक, बनावट एफडी पावत्या देऊन कुटुंबाची फसवणूक केल्याची तक्रार
त्याचप्रमाणे मुलगी आरजू खान हिने बाहेर कापडाचे दुकान लावून त्यातून रोख व इतर प्रकारे एकूण ४६ लाख ८० हजार रुपये आशिषला दिले. तिच्या नावाने ५ जानेवारी २०२६ रोजी २२ लाख, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी २ लाख, १३ मे २०२६ रोजी २ लाख, ४ एप्रिल २०२६ रोजी ८० हजार, ७ मार्च २०२६ रोजी ५० हजार, २५ मे २०२६ रोजी १ लाख, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी १७ लाख आणि २ जुलै २०२६ रोजी १ लाख ५० हजार रुपयांच्या एफडी पावत्या देण्यात आल्या.
याशिवाय बहिणीची मुलगी सनाफातेमा अलीरजा भीमानी (रा. अहमदाबाद) हिच्या नावाने ऑनलाइन पद्धतीने पाठविलेल्या ५ लाख रुपयांच्या बदल्यात १ सप्टेंबर २०२५ रोजी २ लाख, २८ मे २०२५ रोजी २ लाख आणि २२ जून २०२६ रोजी १ लाख रुपयांच्या एफडी पावत्या देण्यात आल्या. अशा प्रकारे एकूण १ कोटी ५० लाख ८० हजार रुपये एफडीमध्ये जमा केल्याचे आशिषने कुटुंबाला दाखविले. (नेरी आर्थिक फसवणूक)
काही दिवसांपूर्वी कुटुंबाला पैशांची गरज भासल्याने जमा रकमेपैकी निम्मी रक्कम परत देण्याची मागणी करण्यात आली; मात्र आशिष टाळाटाळ करू लागला. त्याच्यावर दबाव आणून बँकेत सोबत येण्याचा आग्रह धरताच तो घर सोडून निघून गेला. त्यानंतर कुटुंबीयांनी स्वतः बँकेत जाऊन पडताळणी केली असता कोणतीही रक्कम बँकेत जमा झालेली नसल्याचे आणि हातातील एफडी पावत्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
पैसे परत मागितल्यानंतर आशिषने “माझ्याकडे पैसे नाहीत, तुम्हाला जे करायचे ते करा,” असे म्हणत उडवाउडवीची उत्तरे देऊन दबाव टाकण्यास सुरुवात केली आणि गावातून पसार झाला. तसेच गावातील विनोद फुलझेले यांच्याकडूनही पैसे घेऊन २२ लाख ९ हजार ७७४ रुपयांची एफडी पावती देऊन त्यांनाही रक्कम परत न दिल्याची माहिती तक्रारदारांना समजली. (नेरी आर्थिक फसवणूक)
सुरुवातीला आशिष आज-उद्या पैसे देईल या आशेने तक्रार दिली गेली नव्हती; मात्र पैसे देण्यास स्पष्ट नकार मिळाल्यानंतर २६ नोव्हेंबर २०२६ रोजी नुरी खान यांनी चिमूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तोंडी तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून चिमूर पोलिसांनी १० ऑक्टोबर २०१५ ते २ जुलै २०२६ या कालावधीत घडलेल्या या प्रकाराप्रकरणी २६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२.५४ वाजता गुन्हा नोंद क्रमांक ०७३२ अन्वये आरोपी आशिष लक्ष्मण उरकुडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३१६(५), ३१८(४), ३३५ आणि ३३६(३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळाजी गोविंदराव चव्हाण करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






