चंद्रपूर / कोरपना: Korpana Post Office Fraud प्रकरणात कोरपना तालुक्यातील कोळशी (खुर्द) येथील तत्कालीन शाखा डाकपालाने खातेदारांच्या १ लाख १४ हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. बचत खाती, मुदत ठेव आणि सुकन्या समृद्धी योजनेच्या नावाखाली सामान्य नागरिकांकडून पैसे स्वीकारून ते सरकारी लेख्यात जमा न करता परस्पर लाटण्यात आले. याप्रकरणी टपाल खात्याच्या पडताळणीनंतर संशयित आरोपी विवेक बनसोडे याच्याविरुद्ध कोरपना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (हे हि वाचा – चंद्रपुरातील सराईत गुन्हेगार वर्षभरासाठी स्थानबद्ध)
कोळशी खुर्द डाकघरात Korpana Post Office Fraud कसा उघडकीस आला?
सामान्य नागरिकांनी विश्वासाने टपाल खात्यात गुंतवलेल्या रकमेवर स्वतःचा डल्ला मारून ग्राहकांची तसेच सरकारची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार कोरपना तालुक्यातील कोळशी (खुर्द) येथे उघडकीस आला आहे. बचत खाती, मुदत ठेव आणि सुकन्या समृद्धी योजनेच्या नावाखाली खातेदारांकडून घेतलेली रक्कम सरकारी खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी परस्पर लाटणाऱ्या तत्कालीन शाखा डाकपालाविरुद्ध कोरपना पोलीस ठाण्यात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुकन्या समृद्धी आणि मुदत ठेवीच्या पैशांची परस्पर विल्हेवाट
विवेक बाळू बनसोडे (वय २८ वर्षे, मूळ रा. भीमनगर, सांगोला, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. विवेक बनसोडे हा सप्टेंबर २०२२ ते मार्च २०२५ या कालावधीत कोळशी (खुर्द) येथील शाखा डाकपाल म्हणून कार्यरत होता. २५ मार्च २०२५ रोजी त्याने वैद्यकीय रजेचा अर्ज दिला होता; मात्र तो अर्ज मंजूर करण्यात आला नव्हता. दुसऱ्याच दिवशी कोळशी येथील टपाल कार्यालय बंद असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाल्यानंतर उपविभागीय डाक निरीक्षक अनिल गोविंदराव टेकाम आणि टपाल पर्यवेक्षक मिथुन टोंगे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता कार्यालय कुलूपबंद आढळले. या प्रकाराबाबत वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर पंचांसमक्ष टपाल कार्यालय उघडून तेथील कागदपत्रांची कसून तपासणी करण्यात आली.
या पडताळणीदरम्यान कार्यालयात ग्राहकांनी नवीन खाती उघडण्यासाठी भरलेले अर्ज आणि पावत्या पडून असल्याचे समोर आले. यामध्ये उषा गुलाब पायताडे यांच्या नावे मुदत ठेव खात्यासाठी घेतलेले एक लाख रुपये, तसेच इतर खातेदारांचे सुकन्या योजना व बचत खात्यांसाठी घेतलेले पैसे सरकारी लेख्यात जमाच करण्यात आले नसल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय बंद असलेल्या आवर्ती ठेव (आरडी) खात्यांमध्येही रक्कम स्वीकारून खातेदारांना अधिकृत स्वाक्षरी व शिक्यानिशी पावत्या देण्यात आल्या होत्या. मात्र, नियमानुसार ही सर्व रक्कम टपाल विभागाच्या दैनंदिन हिशोबात न दाखवता, आरोपी डाकपालाने तब्बल १ लाख १४ हजार रुपयांचा अपहार स्वतःच्या व्यक्तिगत आर्थिक लाभासाठी केल्याचे विभागीय चौकशीत स्पष्ट झाले.
टपाल विभागाकडून प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण झाल्यानंतर मूळ कागदपत्रांच्या आधारे डाक निरीक्षक अनिल टेकाम यांनी १८ सप्टेंबर २०२६ रोजी कोरपना पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून कोरपना पोलिसांनी संशयित आरोपी विवेक बनसोडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१६(५) आणि ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार लता वाडीवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप जमादार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांच्या हक्काच्या बचतीवरच टपाल कर्मचाऱ्याने हात साफ केल्याची घटना समोर आल्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






