चंद्रपूर: Chandrapur MPDA Action अंतर्गत जिल्हा पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर पावले उचलत मोठी कारवाई केली आहे. आगामी गणेशोत्सवाच्या काळात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही प्रतिबंधक मोहीम राबवण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या निर्देशानुसार १९ गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुन्हेगार अमोल ईलमकर याच्यावर ही कारवाई करण्यात आली. जिल्हादंडाधिकाऱ्यांनी त्याला एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे अंतिम आदेश जारी केले आहेत.
Chandrapur MPDA Action: गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांची धडक मोहीम
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारी जगतावर पकड मजबूत करत सराईत आणि धोकादायक गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. सणासुदीच्या काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी कठोर पावले उचलत, चंद्रपूर जिल्हा पोलीस अभिलेखावरील कुख्यात चोर आणि धोकादायक गुन्हेगार अमोल आदेश ईलमकर (वय २६ वर्षे, रा. समतानगर, वॉर्ड क्र. ६, दुर्गापूर, ता. जि. चंद्रपूर) याच्यावर ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यान्वये कारवाई करत त्याला एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केले आहेत. (हे हि वाचा – ग्रामसेवकाचा कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा)
अमोल ईलमकरवर विविध ठाण्यांत तब्बल १९ गंभीर गुन्ह्यांची नोंद
दुर्गापूर येथील रहिवासी असलेल्या अमोल ईलमकर याच्यावर दुर्गापूर, रामनगर, बल्लारशाह, घुग्घूस आणि मूल पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, अश्लील शिवीगाळ करणे तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत (आर्म्स ॲक्ट) तब्बल १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सातत्यपूर्ण गुन्हेगारी कारवायांमुळे त्याने परिसरात सामान्य नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण केली होती. त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या, मात्र तरीही कायद्याला न जुमानता त्याने आपल्या गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या होत्या. अखेर त्याच्या वाढत्या उपद्रवाची गंभीर दखल पोलीस अधीक्षकांनी घेतली.
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, धोकादायक व्यक्ती आदी विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याच्या अधिनियमान्वये (एमपीडीए कायदा १९८१, सुधारणा २००९, २०१५) अमोल ईलमकरविरुद्ध स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून जिल्हादंडाधिकारी श्रीमती वसुमना पंत यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत जिल्हादंडाधिकाऱ्यांनी १७ सप्टेंबर रोजी अमोल ईलमकर यास एका वर्षाच्या कालावधीसाठी स्थानबद्ध करण्याचे अंतिम आदेश पारित केले.
सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले (चंद्रपूर), उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले (मूल), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, दुर्गापूरचे ठाणेदार संतोष शेंगावकर, मूलचे ठाणेदार विजय राठोड तसेच सहायक पोलीस निरीक्षक योगेश खरसान यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या कठोर कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून सर्वसामान्यांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






