Vehicle Agency Fraud : चंद्रपुरातील नामांकित शोरूममध्ये 28.50 लाखांचा अपहार; पगार यादीतील दोन नावांमुळे उघड झाला लाखोंचा घोटाळा

चंद्रपूर: Vehicle Agency Fraud प्रकरणामुळे चंद्रपूर शहरात खळबळ उडाली आहे. नागपूर रोडवरील शिवशक्ती व्हेहीकल एजन्सी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तब्बल 28 लाख 50 हजार रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. कंपनीच्या विश्वासू अकाउंटंटवर ग्राहकांकडून जमा झालेली विमा रक्कम बनावट खात्यांमार्फत स्वतःच्या खात्यात वळवल्याचा आरोप आहे. रामनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (१० हजाराची लाच घेताना भूकर मापकासह दोघांना अटक)

चंद्रपूरातील Vehicle Agency Fraud प्रकरणाची संपूर्ण टाइमलाईन

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शंकर अग्रवाल मागील २३ वर्षांपासून हे दुचाकी वाहनांचे शोरूम चालवत असून कंपनीच्या सर्व आर्थिक व्यवहारांसाठी एचडीएफसी बँक चंद्रपूर शाखेत करंट खाते आहे. या खात्यातून होणाऱ्या इंटरनेट बँकिंगच्या व्यवहारांसाठीचा ओटीपी (OTP) हा कंपनीच्या ईमेल आयडीवर येत असे. फेब्रुवारी २०२५ पासून शोरूममध्ये अकाउंटंट म्हणून काम करणारा २५ वर्षीय हर्ष खटवाणी याच्याकडे प्राईम टॅली सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे पगार, टीडीएस, जीएसटी आणि इतर पेमेंट सांभाळण्याची जबाबदारी विश्वासाने सोपवण्यात आली होती, ज्यामुळे सर्व ओटीपी देखील त्यालाच प्राप्त होत असत.

या आर्थिक अफरातफरीचा उलगडा सर्वप्रथम ८ मे २०२६ रोजी झाला, जेव्हा संचालकांनी कर्मचाऱ्यांच्या पगाराची यादी तपासली. त्या यादीत शुभम साखरे आणि यश दुर्गे ही दोन अनोळखी नावे आढळली. हर्षकडे चौकशी केली असता त्यांनी ते आपलेच वर्कर असल्याचे सांगितले, मात्र फाईल्समधील रिझुम तपासले असता तसे काहीही आढळून आले नाही. त्यानंतर संशय अधिक बळावल्याने १८ मे २०२६ रोजी दुपारी जेव्हा कंपनीच्या एचडीएफसी बँक खात्याच्या स्टेटमेंटची सखोल पाहणी करण्यात आली, तेव्हा एका मोठ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला.

शोरूममधील ग्राहकांकडून गोळा केलेली विम्याची रक्कम (इन्शुरन्सची एकमुस्त रक्कम) इन्शुरन्स कंपनीला पाठवण्याऐवजी ती बनावट पद्धतीने बंधन बँकेच्या एका खात्यात वळती करण्यात आली होती. १७ जानेवारी २०२६ ते २४ मार्च २०२६ या कालावधीत एकूण २६ ट्रान्झॅक्शनद्वारे तब्बल २८,५०,००० रुपये या खात्यात अनाधिकृतपणे ट्रान्सफर करण्यात आले होते. या संदर्भात बंधन बँकेच्या व्यवस्थापकांकडे चौकशी केली असता, ही संपूर्ण रक्कम अकाउंटंट हर्ष खटवाणी याच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गोंदिया (रेल टोली) शाखेतील वैयक्तिक बँक खात्यात ट्रान्सफर झाल्याचे स्पष्ट झाले.

आपल्या पदाचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेऊन कंपनीची कोट्यवधी रुपयांची उलाढाल हाताळणाऱ्या अकाउंटंटनेच साथीदारांच्या मदतीने हा अठ्ठावीस लाख पन्नास हजार रुपयांचा अपहार केल्याचे समोर आल्यानंतर अखेर ४ जून २०२६ रोजी रामनगर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार देण्यात आली. रामनगर पोलिसांनी याप्रकरणी ५ जून २०२६ रोजी मध्यरात्री १:४८ वाजता आरोपी हर्ष अशोककुमार खटवाणी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३(5), ३१६(२), ३१६(४) आणि ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत रामनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक प्रभावती एकुर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील सखोल तपास करत आहेत.

Leave a Comment