Hospital Ransomware : चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला

चंद्रपूर: Hospital Ransomware जिल्हा मुख्यालयी सायबर गुन्हेगारीची आतापर्यंतची सर्वात धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली असून, येथील नामांकित ‘चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन‘ (कॅन्सर हॉस्पिटल) या रुग्णालयाच्या मुख्य डिजिटल यंत्रणेवर सायबर माफियांनी भीषण ‘रॅन्समवेअर’ हल्ला चढवला आहे. हॅकर्सनी रुग्णालयाचा मुख्य सर्व्हर पूर्णपणे हॅक करून त्यामधील हजारो रुग्णांचा वैद्यकीय इतिहास आणि व्यवस्थापनाचा संपूर्ण गोपनीय डेटा लॉक केला आहे. हा महत्त्वाचा डेटा परत करण्यासाठी अज्ञात हॅकर्सनी चक्क $1.23456$ ‘बिटकॉईन’ इतक्या मोठ्या रकमेची डिजिटल खंडणी मागितली असून, या हायटेक दरोड्यामुळे वैद्यकीय आणि औद्योगिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. (शहरातील नामांकित दुचाकी शोरूममध्ये लाखोंचा घोळ)

चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवरील सायबर हल्ला Hospital Ransomware

या डिजिटल दरोड्याची सुरुवात १ जून २०२६ रोजी सोमवारच्या पहाटे झाली. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रुग्णालयाच्या आयटी (माहिती तंत्रज्ञान) विभागाला मुख्य संगणकीय यंत्रणेत काहीतरी गंभीर तांत्रिक बिघाड झाल्याचे जाणवले. आयटी तज्ज्ञांनी अधिक तपास केला असता, मुख्य सर्व्हरच्या स्क्रीनवर एक धमकीची ‘रॅन्समवेअर नोट’ झळकत असल्याचे पाहून त्यांचे धाबे दणाणले. अज्ञात हॅकर्सनी सुरक्षिततेची भिंत भेदून अनधिकृतपणे मुख्य प्रणालीत प्रवेश मिळवला होता आणि संपूर्ण यंत्रणाच एका प्रकारे ओलीस धरली होती.

या सायबर हल्ल्यामुळे रुग्णालयाची अत्यंत महत्त्वाची ‘हॉस्पिटल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम’ पूर्णपणे ठप्प झाली आहे. या यंत्रणेमध्ये रुग्णांच्या आजाराचा इतिहास, त्यांच्यावर सुरू असलेले किमोथेरपी व इतर क्लिष्ट उपचार आणि हॉस्पिटलचे अंतर्गत आर्थिक व प्रशासकीय कामकाज चालत असल्याने, सध्या रुग्णालयाच्या दैनंदिन रुग्ण व्यवस्थापनावर याचा मोठा विपरित परिणाम झाला आहे.

हॅकर्सनी सर्व्हरच्या मुख्य स्क्रीनवर सोडलेल्या धमकीच्या संदेशात थेट लिहिले आहे की, तुमचा सर्व डेटा अत्यंत सुरक्षितपणे लॉक आणि कॉम्प्रेस करण्यात आला आहे. हा सर्व डेटा तुम्हाला पुन्हा हवा असल्यास आम्ही दिलेल्या डिजिटल पत्त्यावर $1.23456$ बिटकॉईन पाठवा, पैसे मिळाल्यानंतरच डेटा अनलॅक करण्याची ‘की’ दिली जाईल; जर पैसे दिले नाहीत तर या डेटावर पाणी सोडावे लागेल आणि आम्ही तो इतर कोणालाही दाखवणार नाही. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर धमकीनंतर रुग्णालय प्रशासनाचे संचालक डॉ. राकेश कपुरिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयटी विभागाने तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधला.

या गंभीर प्रकरणी सतीश महेशकुमार थरवानी यांनी दिलेल्या अधिकृत तक्रारीवरून ४ जून रोजी रामनगर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित विविध कलमांखाली अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक प्रभावती त्र्यंबक एकुर्के यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे विशेष पथक या हायटेक गुन्ह्याची पाळेमुळे शोधण्यासाठी आणि डिजिटल पुराव्यांचा छडा लावण्यासाठी युद्धपातळीवर तपास करत आहेत. या अतिसंवेदनशील घटनेने चंद्रपूरसह महाराष्ट्रातील सर्वच मोठ्या रुग्णालयांच्या आणि संस्थांच्या डिजिटल डेटा सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आणला आहे.

Leave a Comment