चंद्रपूर – Amma Ki Dukan या उपक्रमांतर्गत चंद्रपूर येथील युवा उद्योजिका नुपूर तापाली यांना नवीन स्थायी स्वरूपाचा ठेला प्रदान करण्यात आला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते झालेल्या या उपक्रमामुळे नुपूर यांच्या व्यवसायाला स्थैर्य मिळणार असून महिला आर्थिक सक्षमीकरणाला नवे बळ मिळाले आहे. स्वतःच्या मेहनतीवर व्यवसाय उभारणाऱ्या नुपूर तापाली यांच्या संघर्षमय प्रवासाची दखल घेत हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (आमदार जोरगेवार यांच्या हस्ते युवकांचा भाजपात प्रवेश)
Amma Ki Dukan उपक्रमातून नुपूर तापालींना मोठी मदत
यावेळी माजी मंत्री शोभाताई फडणवीस, भाजप चंद्रपूर महानगर प्रभारी अर्चनाताई डेहनकर, भारतीय जनता पक्षाचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, माजी महापौर अंजली घोटेकर, महामंत्री रविंद्र गुरुनुले, सविता दंढारे, नगरसेविका सविता कांबळे, सरला कुळसंगे, विद्या बांगडे, राम जंगम, रामकुमार आक्कापल्लीवार, निलिमा वनकर, शालू कन्नोजवार आदींची उपस्थिती होती.
कुमारी नुपूर तापाली या अत्यंत कमी वयात स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत असून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारीही समर्थपणे पार पाडत आहेत. त्यांच्या कष्टाळूपणाची आणि संघर्षमय प्रवासाची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक सुविधांची पाहणी केली होती.
व्यवसायासाठी वापरला जाणारा ठेला अस्थायी स्वरूपाचा असल्याने त्याची दररोज ने-आण करताना नुपूर यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन त्यांना व्यवसाय अधिक सुलभपणे करता यावा आणि त्यांच्या रोजगाराला स्थैर्य मिळावे, या उद्देशाने नवीन स्थायी स्वरूपाचा ठेला उपलब्ध करून देण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, कुमारी नुपूर तापाली यांच्यासारख्या धाडसी आणि मेहनती उद्योजिका समाजासाठी प्रेरणादायी आहेत. अत्यंत कमी वयात त्यांनी स्वबळावर व्यवसाय उभारून आत्मनिर्भरतेचा आदर्श निर्माण केला आहे. अशा कष्टाळू महिलांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या बळावर स्वतःचे भविष्य घडविणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे.
ते पुढे म्हणाले की, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे समाजाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा उद्योजकांना आवश्यक ते सहकार्य मिळाल्यास त्या केवळ स्वतःच नव्हे, तर अनेकांसाठी रोजगार आणि प्रेरणा निर्माण करू शकतात. भविष्यातही अशा कष्टाळू उद्योजकांसाठी शक्य ती सर्व मदत करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे त्यांनी सांगितले.