Gutkha Smuggling प्रकरणात चंद्रपुरात जप्त गुटखा व तंबाखू

चंद्रपुरात दुचाकीवरून आणला सुगंधित तंबाखू, महिला ताब्यात

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 7, 2026

चंद्रपूर: Gutkha Smuggling विरोधात चंद्रपूर जिल्हा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने कठोर मोहीम सुरू ठेवली आहे. दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी दुचाकीवरून प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या आरोपींवर कारवाई केली. या कारवाईत 41 हजार रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून एका महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील तंबाखू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. (चंद्रपुरातील कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला)

अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने पोलीस अशा समाजकंटकांवर सातत्याने धाडी टाकत असून, यापूर्वी अशाच एका मोठ्या गुन्हेगारी टोळीवर थेट ‘मिनी मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुचाकीवरून प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक करणाऱ्या तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुर्गापूर परिसरात सापळा रचून कारवाई Gutkha Smuggling

मिळालेल्या माहितीनुसार, ४ जून २०२६ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास तुकुम दुर्गापूर रोडवरील पुलीया नेरी वॉर्ड परिसरात पोलीस उपनिरीक्षक नरेश उरकुडे व त्यांच्या पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी कुणाल गो. मुळे यांच्यासह सापळा रचला होता. यावेळी होन्डा एक्टिवा दुचाकीवरून (क्रमांक MH 34 CP 3884) प्रतिबंधित साठा घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना थांबवले. पोलिसांना पाहताच दुचाकी चालक रुद्राक्ष किशोर बुरांडे (रा. तुकुम) हा घटनास्थळावरून पळून गेला, तर त्याच्यासोबत असलेली महिला आरोपी रक्षा किशोर ठक्कर (वय २५, रा. ऊर्जानगर) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये मानवी आरोग्याला घातक असलेला आणि कर्करोगाला निमंत्रण देणारा एकूण ४१,२७६ रुपयांचा सुगंधित तंबाखू व पान मसाल्याचा साठा जप्त करण्यात आला. यात २६ किलो वजनाचा होला हुक्का शिशा सुगंधित तंबाखू, विमल पान मसाला, व्ही वन तंबाखू आणि सिग्नेचर पान मसाला यांचा समावेश होता. चौकशीत हा माल इंदिरानगर येथील मुख्य पुरवठादार सचिन दमकोंडावार याच्याकडून खरेदी केल्याचे समोर आले असून तो सध्या फरार आहे.

या प्रकरणी ५ जून २०२६ रोजी दुर्गापूर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ सह भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ठाणे प्रभारी संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, पोलीस प्रशासनाने तंबाखू माफियांचे कंबरडे मोडण्याचा इशारा दिला आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment