Nagbhid Bribery Case मध्ये ACB चंद्रपूरची कारवाई

१० हजार द्या आताचं काम करतो, Nagbhid Bribery Case दोघांना अटक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 5, 2026

चंद्रपूर: Nagbhid Bribery Case मध्ये चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत नागभीड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भुकर मापक रंजीत कनोजकर आणि एका खाजगी इसमाला 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. वारस नोंद फेरफार करण्याच्या कामासाठी लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ACB ने सापळा रचून ही कारवाई केली. या घटनेमुळे नागभीड तालुक्यात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.. (बनावट प्रमाणपत्राच्या आधारे दीड कोटीचे कंत्राट, गुन्हा दाखल)

नागभीडमध्ये ACBची मोठी कारवाई

तक्रारदाराच्या आजोबांचे निधन झाले असल्याने, त्यांच्या नावावर असलेली घराची जागा वडिलांच्या नावावर फेरफार (वारस नोंद) करायची होती. या कामासाठी तक्रारदाराने नागभीड येथील भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन भुकर मापक रंजीत कनोजकर यांच्याकडे अर्ज केला होता. हे काम करून देण्याच्या बदल्यात कनोजकर यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

परंतु, तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी थेट चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाऊन रीतसर तक्रार नोंदवली.

एसीबीचा सापळा आणि कारवाई

तक्रारीच्या आधारे ४ जून २०२६ रोजी पंचांसमक्ष या प्रकरणाची पडताळणी करण्यात आली. त्यादरम्यान आरोपी कनोजकर यांनी तडजोडीअंती १० हजार रुपये लाच घेण्याचे मान्य केले. त्यानुसार, ५ जून २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला.

तक्रारदाराने लाचेच्या रक्कमेसाठी कनोजकर यांना फोन केला असता, त्यांनी ही रक्कम खाजगी इसम जयंत कामडी याच्याकडे देण्यास सांगितले. कामडी याने तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले. यासोबतच मुख्य आरोपी रंजीत कनोजकर यालाही अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

कारवाई करणारे पथक

सदर यशस्वी कामगिरी नागपूर ला.प्र.वि.चे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनात पार पडली. चंद्रपूर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलीस निरीक्षक सचिन धर्मेजवार, तसेच अंमलदार रविकुमार इंगळे, अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, सचिन गजभिये, मेघा मोहुर्ले, सतीश सिडाम आणि संदीप कौरासे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

नागरिकांना आवाहन: कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ एसीबी चंद्रपूरशी संपर्क साधावा. (टोल फ्री क्रमांक: १०६४) .

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “१० हजार द्या आताचं काम करतो, Nagbhid Bribery Case दोघांना अटक”

  1. नागभिड प्रकरणातील या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई होणे अत्यंत आवश्यक होते किती तरी लोकांनी ऑफिसमध्ये जाणे टाळणे चालू केलं होतं. नेहमी अडी रवीची भाषा थांबवणे भीती दाखवणे आणि त्याच्यावरून पैशाची मागणी करणे हा या अधिकाऱ्याचा नेहमीच कार्य होऊन गेले होते. अशा अधिकाऱ्याला प्रतिबंधात्मक कार्यवाही होणे ही सर्वसामान्य लोकांना समाधानची बाब आहे.

    Reply

Leave a Comment