चंद्रपूर – कृषी सहाय्यक लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कोरपना येथे सापळा कारवाई केली. बंधाऱ्याचे बिल मंजूर करण्यासाठी ४० हजार रुपये घेताना एकाला ताब्यात घेतले. एसीबीने सांगितल्यानुसार, मंगळवारी, २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही कारवाई झाली. सुरुवातीला ५५ हजारांची मागणी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. वर्धा एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. गडचांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास सुरू आहे. (जुगार अड्ड्यावर धाड, पोलिसांची चाहूल लागताच जुगारी पळाले)
कृषी सहाय्यक लाच प्रकरण: नेमके काय घडले?
चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यात एक खळबळजनक घटना समोर आली असून, बंधाऱ्याच्या कामाचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी तब्बल ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कोरपना येथील कृषी सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने आज रंगेहात अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे शासकीय वर्तुळात व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणातील ४६ वर्षीय तक्रारदार यांनी केलेल्या बंधाऱ्याचे शासकीय बिल मंजूर करण्यासाठी आरोपी लोकसेवक हरी विठ्ठलराव उदगीरे (वय ३५, रा. शिक्षक कॉलनी, गडचांदूर, जि. चंद्रपूर, मूळ रा. हनुमंत जवळगा, ता. चाकूर, जि. लातूर), पद: कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कोरपणा यांनी सुरुवातीला ५५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती ४० हजार रुपये देण्याचे ठरले. लाचेच्या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वर्धा यांच्याकडे तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे आज दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी शासकीय पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यात आली असता, आरोपीने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून आरोपी हरी उदगीरे याला तक्रारदाराकडून ठरलेली ४० हजार रुपयांची लाचेची रक्कम (५०० रुपयांच्या ८० नोटा) स्वीकारताना सायंकाळी ६ वाजता रंगेहात ताब्यात घेतले.
आरोपीच्या अंगझडतीतून एक ‘विव्हो’ कंपनीचा मोबाईल फोन व ५९५ रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून, त्याच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी पोलीस ठाणे गडचांदूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक श्री. केदार करीत आहेत. ही यशस्वी सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धा पथकाचे पोलीस निरीक्षक संदीप मुपडे, पोलीस हवालदार मंगेश झामरे, सचिन गाडवे, पोलीस शिपाई प्रीतम इंगळे, लक्ष्मण केंद्रे व विष्णू काळुसे यांनी पार पाडली आहे. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीच्या वतीने करण्यात आले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






