चंद्रपूर – चंद्रपूर हत्या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर मंगळवारी (२७ ऑक्टोबर) रात्री एका युवकाची हत्या झाली. छोटी बाजार चौक सिग्नलजवळील एका भोजनालयासमोर ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकने युवकाच्या डोक्यावर वार करण्यात आले. मृत युवकाची ओळख रंजीत राजवंशी (३६, रा. बल्लारशाह) अशी पटली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शहर पोलिसांनी अमन कुरवे (२९) याला अवघ्या अर्ध्या तासात अटक केली. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (४० हजाराची लाच घेताना कृषी सहाय्यकाला अटक, वाचा बातमी)
अतिवर्दळीच्या ठिकाणी व शहरातील मुख्य मार्गावर एका युवकाची हत्या करण्यात आली, हि खळबळजनक घटना येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी आपल्या डोळ्यांनी बघितली मात्र कुणीही हल्लेखोराला अडविले नाही, माणुसकी इथेच संपल्याचे चित्र या घटनेतून पुढे आले आहे.
चंद्रपूर हत्या: छोटी बाजार चौकात नेमके काय घडले?
चंद्रपूर शहरातील अतिव्यस्त मार्गावरील जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर मंगळवारी रात्री एक संतापजनक घटना उघडकीस आली. शहरातील छोटी बाजार चौक सिग्नलजवळ असलेल्या ‘श्रीमान सावजी भोजनालय’समोर एका युवकावर सिमेंटच्या पेवर ब्लॉकने बेदम हल्ला करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. हल्लेखोराने रस्त्याच्या कडेला पडलेल्या पेव्हर ब्लॉक म्हणजे गट्टू ने युवकाच्या डोक्यावर ६ ते ७ वेळा वार केले. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
या घटनेत मृतकाची ओळख ३६ वर्षीय रंजीत सुरेश राजवंशी (रा. बल्लारशाह) अशी पटली आहे, तर या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख पंचशील चौक, जटपुरा वार्ड, चंद्रपूर येथील २९ वर्षीय अमन दीपक कुरवे अशी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा यापूर्वीच चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यांच्या रेकॉर्डवर आहे.
प्राप्त माहितीनुसार, २७ ऑक्टोबरच्या रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळ आरोपी अमन कुरवे एका युवकावर सिमेंटच्या पेवर ब्लॉकने हल्ला करत होता. यादरम्यान, परिसरातील नागरिक बघ्याची भूमिका घेऊन होते, त्यापूर्वीच हल्लेखोराने रस्त्यावर पडलेल्या युवकाच्या डोक्यावर सलग ६ ते ७ वार करून त्याला गंभीर जखमी केले. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा शासकीय रुग्णालयातील चौकीचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमीला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, जेथे त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याची प्रकृती अतिशय खालावली होती आणि काही वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. मृतकाने घटनेच्या दिवशी दुपारीच उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हजेरी लावली होती आणि प्राथमिक उपचार घेतल्यानंतर तो कोणालाही न सांगता तिथून निघून गेला होता. रुग्णालयाच्या कागदपत्रांच्या आधारेच त्याची ओळख रंजीत सुरेश राजवंशी म्हणून पटली.
सीसीटीव्हीमुळे अर्ध्या तासात आरोपी अटक
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिसांच्या डीबी पथकाने तत्काळ तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत, या खुनाच्या घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासाच्या आत आरोपी अमन कुरवे याला बेड्या ठोकल्या.
सध्या या युवकाच्या हत्येमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. आरोपीने नेमक्या कोणत्या कारणातून हा हल्ला केला, मृतक आणि आरोपीमध्ये पूर्वीपासून काही वाद होता का आणि या खूनी वादामागील नेमकी पार्श्वभूमी काय होती, या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासाअंतीच समोर येतील. जिल्हा शासकीय रुग्णालयासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणासमोर, मुख्य मार्गावर नागरिकांच्या डोळ्यांदेखत घडलेल्या या हत्येने शहरवासीयांना हादरवून सोडले आहे. आता पोलीस तपासातूनच या हत्येमागचे सत्य बाहेर येणार आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






