मनोज दुबे विरूर पोलीस ठाण्यात राडा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेलं राजुरा तालुक्यातील पोलीस ठाणे

पोलीस ठाण्यात मद्यधुंद अवस्थेत सत्तुरसह राडा; अर्ध्या तासाने चुनाळ्यात तिघांचा हल्ला

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 1, 2026

चंद्रपूर: मनोज दुबे विरूर पोलीस ठाण्यात मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, त्यांच्या कमरेला धारदार सत्तुर आढळल्याने तो पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.

यानंतर अर्ध्या तासाने चुनाळा येथे तिघांनी त्यांना लाकडी काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. यात दुबे गंभीर जखमी झाले असून त्यांना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही प्रकरणांत स्वतंत्र गुन्हे नोंदवले असून पोलीस तपास करत आहेत. (DNR ट्रॅव्हल्स मालकाचा मुलगा पोलिसांच्या अंगावर धावला, गुन्हा दाखल, वाचा हि बातमी)

मनोज दुबे विरूर पोलीस ठाण्यात काय घडलं?

प्राप्त माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास विरुर पोलीस ठाण्यात तैनात असलेला पोलीस अंमलदार मनोज सुनील दुबे (वय ४०) हा प्रचंड मद्यधुंद अवस्थेत पोलीस ठाण्यात आला. तिथे हजर असलेल्या कर्मचाऱ्यांशी त्याने हुज्जत घालत भीती दाखवण्यास सुरुवात केली. मद्यधुंद मनोज दुबे याने पोलीस ठाण्यातील मोर्चाचा दरवाजा जोरजोराने आपटण्यास सुरुवात केली. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, तो सर्वांच्या अंगावर धावून गेला. दरम्यान, त्याच्या कमरेला धारदार आणि लांब पात्याचे लोखंडी सत्तुर खोचलेले असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हजर कर्मचाऱ्यांनी पंचांसमक्ष त्याला पकडून त्याची अंगझडती घेतली आणि त्याच्याजवळील घातक सत्तुर जप्त केले. स्वतः पोलीस कर्मचारी असताना घातक शस्त्र बाळगून दहशत पसरवल्याप्रकरणी अंमलदार अविनाश भीमराव बोरुले यांच्या तक्रारीवरून विरुर पोलीस ठाण्यात मनोज दुबेविरुद्ध शस्त्रास्त्र कायदा आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

अर्ध्या तासाने चुनाळा MIDC रोडवर हल्ला

या घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासात म्हणजेच दुपारी १२:०० वाजेच्या सुमारास दुसरी गंभीर घटना घडली. विरुर पोलीस ठाण्यात कसलीही ड्युटी नसल्याने मनोज दुबे हा चंद्रपूर येथे उपचार घेत असलेल्या आपल्या मोठ्या भावाला भेटण्यासाठी स्वतःच्या मोटारसायकलने विहीरगाव-राजुरा मार्गाने निघाला होता. विरुर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने मनोज दुबे चंद्रपूरच्या दिशेने निघाल्याची माहिती आरोपींना दिली.

या माहितीच्या आधारे शुभम उर्फ बंटी अरुण पिपरे, प्रतीक उर्फ गोलू पिपरे (दोन्ही रा. पेठवार्ड, राजुरा) आणि मयूर निखाडे (रा. चुनाळा) यांनी एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारने (क्रमांक MH-34-CJ-1663) रेल्वे फाटकापासून मनोज दुबेचा पाठलाग सुरू केला. राजुराजवळील चुनाळा येथील MIDC रोडवर, विहान बारच्या मागे मनोज दुबे थांबला असता, या तिघांनी कारमधून उतरून त्याला काहीही न बोलता लाकडी काठीने जबर मारहाण केली. या प्राणघातक हल्ल्यात मनोज दुबे याच्या कपाळाला, डोळ्याच्या बाजूला, कोपराला, पायाला आणि कंबरेला गंभीर दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच विरुर पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत रक्ताळलेल्या अवस्थेत पडलेल्या मनोज दुबेला ताब्यात घेतले आणि उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८(१) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच कर्मचाऱ्याशी संबंधित अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतराने घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे पोलीस वर्तुळात आणि राजुरा तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment