चंद्रपूर गोवंश तस्करी प्रकरणी सावरकर चौकात पोलिसांनी पकडलेला आयशर ट्रक

चंद्रपूर गोवंश तस्करी : सावरकर चौकात ट्रक पकडला, २६ गोवंशांची सुटका

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 1, 2026

चंद्रपूर: चंद्रपूर गोवंश तस्करी प्रकरणी पोलिसांनी सावरकर चौकात आयशर ट्रक पकडला आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, पोलीस मुख्यालयासमोर १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ही कारवाई झाली. ट्रकमध्ये २४ गाई आणि २ बैल असे २६ गोवंश आढळले.

पोलिसांनी ट्रकसह एकूण २० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ट्रकचालकाला जागीच अटक झाली असून, मुख्य सूत्रधार मानला जाणारा एक आरोपी फरार आहे. रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. (पोलीस कर्मचाऱ्याचा आधी राडा, नंतर पोलिसांवर हल्ला, वाचा हि बातमी)

चंद्रपूर गोवंश तस्करी : सावरकर चौकात नाकाबंदी

१ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास अवैध गोवंश वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सावरकर चौक परिसरात पहाटे ५:४० वाजताच्या सुमारास नाकाबंदी लावली. सकाळी ७:४० वाजताच्या दरम्यान शंकास्पद रीतीने येणारा आयशर ट्रक (क्रमांक MH 34 T 3211) पोलिसांनी अडवला. वाहनाची पाहणी केली असता त्यात अत्यंत क्रूरतेने कोंबून नेले जाणारे २४ गाई आणि २ बैल असे एकूण २६ गोवंश आढळून आले. हे सर्व गोवंश अंदाजे ८ ते १२ वर्षे वयाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून १५ लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक, ५ लाख २० हजार रुपये किमतीचे २६ गोवंश आणि २० हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण २० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ट्रक चालक प्रशांत बालाजी जुमनाके (वय ३० वर्षे, रा. वार्ड क्र. ४, गडचांदूर, ता. कोरपना, जि. चंद्रपूर) याला जागीच ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. तर या तस्करीतील मुख्य सूत्रधार मानला जाणारा मुन्ना शेख (रा. गडचांदूर, ता. कोरपना, जि. चंद्रपूर) हा फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

अवैध गोवंश वाहतूक आणि प्राण्यांवर क्रूर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११(१)(घ)(ड)(छ)(ज), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ सुधारित २०१५ चे कलम ५(अ), ९, ११ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे सहकलम ३(५), ४९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई उपविभाग चंद्रपूर पथकाने पार पाडली असून, शहरातील अवैध धंद्यांवर आणि तस्करांवर या कारवाईमुळे मोठा वचक बसला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment