गडचांदूर: गडचांदूर गोवंश तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गडचांदूर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने तेलंगणाकडे जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग करून ३७ गोवंश जनावरांची सुटका केली. आज, १२ ऑक्टोबर रोजी ही कारवाई झाली. पोलिसांनी ट्रक आणि जनावरांसह एकूण २२ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, एकाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. (राजुऱ्यात लाखोंचे टायर चोरीला, वाचा बातमी)
गडचांदूर गोवंश तस्करी: गुप्त माहितीवरून भोयगावात नाकाबंदी
प्राप्त माहितीनुसार, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी गडचांदूर पोलिसांच्या डी.बी. पथकाला गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, मौजा भोयगाव मार्गाने एका कथ्या रंगाच्या अशोक लेलँड कंपनीच्या १४ चाकी ट्रकमध्ये (क्रमांक MH 34 AV 2312) गोवंश जातीची जनावरे अत्यंत निर्दयीपणे कोंबून कत्तलीकरिता तेलंगणा राज्यात नेली जात आहेत. या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवत मौजा भोयगाव येथे नाकाबंदी लावली. नाकाबंदीदरम्यान चंद्रपूर बाजूकडून भोयगाव मार्गे संशयित कथ्या रंगाचा ट्रक येताना दिसला. पोलिसांनी चालकाला हाताने इशारा करून ट्रक थांबवण्याचा आदेश दिला, मात्र चालकाने पोलिसांचा इशारा कशाचीही तमा न बाळगता ट्रक भरधाव वेगाने पुढे पळवून नेला.
पारडी येथे ट्रकचा पाठलाग संपला, चालक ताब्यात
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि सिनेस्टाईल पद्धतीने त्या ट्रकचा पाठलाग सुरू केला. पोलीस पाठीमागे लागल्याचे पाहून आरोपींनी ट्रक मौजा गडचांदूर-कोरपना मार्गाने तेलंगणा राज्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मौजा पारडी येथे लावण्यात आलेल्या नाकाबंदीवर पुन्हा पोलिसांना पाहून चालकाने पकडले जाण्याच्या भीतीने ट्रक रस्त्याच्या कडेला सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलीस कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत पाठलाग करून चालकाला जागीच पकडले.
यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष जप्त केलेल्या ट्रकची पाहणी केली असता, ट्रकमध्ये अत्यंत अमानुषपणे आणि दाटीवाटीने बांधलेले एकूण ३७ बैल व गायी आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या जनावरांची एकूण किंमत सुमारे ७ लाख ४० हजार रुपये इतकी आहे. याशिवाय, वाहतुकीसाठी वापरलेला १५ लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा १४ चाकी ट्रक आणि आरोपीकडील १ हजार रुपये किमतीचा एच.एम.डी. कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल फोन असा एकूण २२ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सुटका करण्यात आलेल्या सर्व ३७ गोवंशीय जनावरांच्या योग्य व्यवस्थापनासाठी आणि संगोपनासाठी त्यांना ‘गोरक्षण यार फाउंडेशन पडोली, चंद्रपूर’ येथे सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुलाम अली मुसाहिब अली खान वय 48 वर्ष राहणार वार्ड क्रमांक चार तालुका कोरपणा जिल्हा चंद्रपूर विरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(घ),(ड)(च)(ज), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे सुधारित कलम ५(ए), ५(बी), ९, ११ सह भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम ३२५, २८९, ४९ आणि मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. एकूण तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
सदर यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, पोलीस उपनिरीक्षक पंकज हेकाड, पोलीस हवालदार शीतल बोरकर, पोलीस नाईक बलवंत शर्मा, पोलीस अंमलदार साईनाथ उपरे, सुरज ढोले, प्रकाश बाजगीर, मनोहर जाधव आणि श्रीनिवास सोडणार यांच्या पथकाने पार पाडली.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







1 thought on “गडचांदूर पोलिसांची गोवंश तस्करीवर कारवाई: ट्रकचा पाठलाग करून ३७ जनावरांची सुटका”