भद्रावती रेती तस्करी प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेले ट्रॅक्टर आणि ट्रॉली

भद्रावतीत रेती तस्करीवर पोलिसांची कारवाई: दोन ट्रॅक्टरसह १२.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 12, 2026

भद्रावती: भद्रावती रेती तस्करी प्रकरणात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. चपराळा नाल्याकडून ओ.एफ. चांदा भद्रावतीकडे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली. आज, १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ही कारवाई झाली. पोलिसांनी दोन ठिकाणी नाकाबंदी करून १२ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. पुढील तपास भद्रावती पोलीस करत आहेत. (सिनेस्टाइल पाठलाग करीत गोवंश तस्करावर गडचांदूर पोलिसांची कारवाई, वाचा हि बातमी)

भद्रावती रेती तस्करी: चपराळा नाल्याजवळ गुप्त माहितीवरून नाकाबंदी

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, भद्रावती पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला खबऱ्यामार्फत पक्की बातमी मिळाली होती की, मौजा चपराळा नाल्याकडून ओ.एफ. चांदा भद्रावती गावाकडे दोन लाल रंगाच्या ट्रॅक्टरद्वारे अवैधपणे रेतीची चोरी करून तिची वाहतूक केली जात आहे. या माहितीची तात्काळ दखल घेत पोलीस पथकाने प्रभारी अधिकाऱ्यांना अवगत केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पंचांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ओ.एफ. चांदा परिसर २ किमी उत्तर भागात दोन वेगवेगळ्या ठिकाणी रणनीतिक पद्धतीने नाकाबंदी केली.

पहिल्या कारवाईत ट्रॅक्टर, ट्रॉली आणि दुचाकी जप्त

नाकाबंदीदरम्यान दुपारी २:४५ ते ३:३० वाजेच्या सुमारास पहिल्या कारवाईत पोलिसांनी १ ब्रास अवैध रेती, ५ लाख रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर (क्र. MH-34-CD-2822), ७० हजार रुपये किमतीची हायड्रोलिक जॅक असलेली ट्रॉली (क्र. MH-34-L-3955) आणि ८० हजार रुपये किमतीची बजाज पल्सर मोटारसायकल (क्र. MH-34-BU-2707) असा एकूण ६ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात ट्रॅक्टर चालक संदीप विश्वनाथ मरस्कोल्हे (वय ४०, रा. जुना सुमठाणा) आणि ट्रॅक्टर मालक ऋषीकेश बंडू गोरे (वय २८, रा. खापरी वॉर्ड क्र. ६, भद्रावती) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर ताब्यात

त्यानंतर लगेचच दुपारी ३:०० ते ३:४५ वाजेच्या सुमारास केलेल्या दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी १ ब्रास अवैध रेती, ५ लाख रुपये किमतीचा मॅसी फर्ग्युसन ७२५० डीआय कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर (क्र. MH-34-CD-7583) आणि ७० हजार रुपये किमतीची बिनक्रमांकाची लोखंडी हायड्रोलिक ट्रॉली असा एकूण ५ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणात ट्रॅक्टर मालक संतोष राघुजी धानोडे (वय ४०, रा. खापरी) आणि चालक विजय पांडुरंग आडे (वय ३९, रा. खापरी, भद्रावती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दोन्ही कारवायांमध्ये एकूण २ ब्रास रेती, दोन ट्रॅक्टर, दोन ट्रॉली आणि एक दुचाकी असा मिळून १२ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करून जप्त केला आहे. या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम ३०३(२), ३(५) सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४८ अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.

सदर यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात परिपूर्ण पोलीस उपअधीक्षक सचिन क्षेत्रे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, पोलीस हवालदार अनुप आस्तूनकर, देवानंद डुकरे, गोपाळ आतकुलवार, प्रशांत शेंदरे, योगेश घाटोळे, संतोष राठोड, खुशाल कावडे आणि महिला पोलीस अंमलदार मोणाली गारघाटे यांनी पार पाडली.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment