गडचांदूर (चंद्रपूर) : Gadchandur Cattle Smuggling Action अंतर्गत पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. गडचांदूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने थरारक पाठलाग करून ३५ गोवंशाची सुटका केली. कत्तलीच्या उद्देशाने वाहनातून नेल्या जाणाऱ्या जनावरांना वाचवण्यात यश आले. (हे हि वाचा – वाढदिवसाच्या पार्टीत तुफान राडा)
या कारवाईत १२ चाकी ट्रकसह २२ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. आरोपी चालकाने नाकाबंदी तोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. कोरपना तालुक्यातील परसोडा फाटा येथे ट्रकला अडवण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यात अवैध गोवंश तस्कराविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी आणि धडक कारवाई केली आहे. पोलीस स्टेशन गडचांदूर येथील गुन्हे शोध पथकाने थरारक सिनेस्टाईल पाठलाग करून कत्तलीच्या उद्देशाने वाहनातून नेल्या जाणाऱ्या ३५ लहान-मोठ्या गोवंशांची यशस्वी सुटका केली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला १२ चाकी ट्रक आणि मोबाईल असा एकूण २२ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भोयगाव येथे नाकाबंदी तोडून आरोपीचा तेलंगणाच्या दिशेने पोबारा
मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी गडचांदूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. चंद्रपूर मार्ग ते भोयगावमार्गे गडचांदूरकडे एक १२ चाकी मोठा ट्रक क्रमांक MH-27 X-8886 यामधून गोवंश जातीची जनावरे कत्तलीकरिता घेऊन जाण्यात येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ६ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास मौजा भोयगाव येथे अत्यंत गुप्तपणे नाकाबंदी लावली. पहाटे सुमारे ३:३० वाजेच्या सुमारास संशयित ट्रक भोयगावच्या दिशेने येताना दिसला. पोलिसांच्या पथकाने चालकाला हाताच्या इशारा करून वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलिसांना पाहताच चालकाने वाहनाचा वेग वाढवून नाकाबंदी तोडली आणि तेलंगणा राज्याच्या दिशेने पळ काढला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस पथकाने तातडीने वरिष्ठांना पूर्वकल्पना दिली आणि भरधाव वेगात असलेल्या ट्रकचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. अखेर कोरपना तालुक्यातील मौजा परसोडा फाटा येथे पोलिसांनी ट्रकला अडवून थांबवले. पोलीस जवळ येत असल्याचे पाहून ट्रक चालकाने अंधाराचा आणि शेजारील जंगलाचा फायदा घेत पळ काढला. पोलिसांनी शोधमोहीम राबवली परंतु तो हाती लागला नाही.
वाहनात कोंबलेले ३५ लहान-मोठे गोवंश पोलिसांकडून जप्त
त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष वाहनाची पाहणी केली असता, ट्रकमध्ये अत्यंत अमानुषपणे आणि कोंबून ठेवलेले ३५ लहान-मोठे गोवंश (बैल) आढळून आले. या जनावरांची बाजारभावाप्रमाणे एकूण किंमत ७ लाख रुपये आहे. याशिवाय १५ लाख रुपये किमतीचा १२ चाकी ट्रक आणि १ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण २२,०१,००० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या सर्व जनावरांच्या सुरक्षेसाठी, वैद्यकीय तपासणीसाठी आणि चाऱ्याची सोय करण्यासाठी त्यांना चंद्रपूर येथील ‘प्यार फाउंडेशन’कडे सुपूर्द करण्यात आले आहे.
या प्रकरणी फरार ट्रक चालक व मालकाविरुद्ध गडचांदूर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ४०९/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर प्राण्यांना क्रूरपणे वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० च्या कलम ११(१)(घ)(ड)(च)(ज), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(अ), ५(ब), ९, भारतीय न्याय संहिता कलम ३२५, २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, २३९ आणि मोवाका अंतर्गत गुन्हे दाखल करून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूरचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज हेकाड, पोलीस अंमलदार बळवंत शर्मा, साईनाथ उपरे, मनोहर जाधव, सुरज ढोले, प्रकाश बाजगीर आणि राजरतन बोरूडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे गोवंश तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






