कोरपना (चंद्रपूर): (Korpana Cattle Smuggling) प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तेलंगणा सीमेजवळ कत्तलीसाठी पायदळ नेण्यात येणाऱ्या पाच गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी एका आरोपीला अटक करून ७५ हजार रुपयांचा गोवंश जप्त केला. (अमरावतीच्या व्यक्तीची चंद्रपुरात हत्या, आरोपी अटकेत)
महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती भागात सक्रिय असलेल्या गो-तस्करांच्या नवनवीन क्लृप्त्या हाणून पाडण्यात कोरपना पोलिसांना मोठे यश आले आहे. कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत निर्दयतेने पायदळ तेलंगणा राज्यात नेले जात असलेल्या ५ गोवंशीय जनावरांची कोरपना पोलिसांनी सुटका केली असून, याप्रकरणी जिवती तालुक्यातील एका तस्कराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईत सुमारे ७५ हजार रुपये किमतीचे बैल जप्त केले आहेत.
Korpana Cattle Smuggling प्रकरणात ५ बैलांची सुटका
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, २६ जून २०२६ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास कोरपना पोलिसांना एका गोपनीय बातमीदाराकडून विश्वासू माहिती मिळाली होती. मौजा सावलहिरा ते येलापूर मार्गे तेलंगणा राज्यातील मेंढीगुडा येथे एक इसम गोवंशीय जनावरांना एकमेकांना दोरीने बांधून, अत्यंत क्रूरतेने कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची ती खबर होती. माहिती मिळताच कोरपना पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने हालचाली करत सावलहिरा ते येलापूर घाटाजवळ पंचांसमक्ष सापळा रचून नाकाबंदी केली. (इटनकर च्या पान टपरीवर एमडी पावडरची विक्री)
या नाकाबंदीदरम्यान पोलिसांना संशयास्पद रित्या ५ बैलांना दोरीने बांधून पायी घेऊन जाणारा एक व्यक्ती आढळून आला. पोलिसांनी त्याला थांबवून ताब्यात घेतले आणि या गोवंशाबाबत अधिकृत खरेदी-विक्रीची पावती किंवा परवान्याची मागणी केली असता, त्याने आपल्याकडे कोणतीही पावती नसल्याचे सांगितले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, ४५ हजार रुपये किमतीचे ३ पांढऱ्या रंगाचे बैल आणि ३० हजार रुपये किमतीचे २ धामण्या रंगाचे बैल, असा एकूण ७५ हजार रुपये किमतीचा गोवंश कत्तलीसाठीच नेला जात असल्याचे स्पष्ट झाले.
या बेकायदेशीर कृत्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी लक्ष्मण लेतू कोडापे (वय ४० वर्षे, रा. गुडशेला, ता. जिवती, जि. चंद्रपूर) याच्याविरुद्ध कोरपना पोलीस ठाण्यात अपहार क्रमांक २६५/२०२६ नुसार महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम ५ (अ), ५ (ब), ६, ९ सह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११ (१) (ड) अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
कोरपना पोलीस ठाण्याची हद्द थेट तेलंगणा राज्याला लागून असल्याने या भागात गो-तस्कर नेहमीच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. वाहनांतून होणाऱ्या तस्करांवर पोलिसांची कडक नजर असल्याने, यावेळी तस्करांनी चक्क पायदळ जंगलाच्या व घाटाच्या मार्गाने गोवंश नेण्याचा प्रयत्न केला होता; मात्र पोलिसांनी योग्य वेळी त्यांच्या मुसक्या आवळल्या. सदरची धडक कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, आणि गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार काश्यप वाळके (ब.नं. ४०८) व विशाल मोरे (ब.नं. १६५६) यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास नायक पोलीस अंमलदार रामदास आडे (ब.नं. २२१९) हे करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






