Rajura Bike Theft प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेल्या सात मोटारसायकली

एका दुचाकी चोरीची तक्रार आली, पोलिसांनी थेट ७ दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 27, 2026

राजुरा (चंद्रपूर): Rajura Bike Theft प्रकरणात राजुरा पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन वाहनचोरांना अटक केली आहे. आरोपींकडून राजुरा, चंद्रपूर आणि तेलंगणा परिसरातील चोरीच्या ७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश झाला असून वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राजुरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने (DB) वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत दोन अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपींकडून राजुरा, चंद्रपूर जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशन तसेच थेट शेजारील तेलंगणा राज्यातील वांकडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या एकूण ७ मोटारसायकली जप्त केल्या असून, या जप्त केलेल्या वाहनांची एकूण किंमत २ लाख ६३ हजार रुपये आहे. (पान टपरीवर एमडी पावडरची विक्री)

Rajura Bike Theft प्रकरणाचा संपूर्ण तपशील

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मृत्युंजय आशुतोष बिश्वास (वय ५५ वर्षे, रा. भिवापूर वार्ड, चंद्रपूर) हे वेल्डिंगचे काम करतात. त्यांनी २५ जून २०२६ रोजी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की, २२ जून २०२६ रोजी दुपारी १२:३० ते २:०० वाजेच्या सुमारास राजुरा तहसील कार्यालयाच्या समोरील गेटवरून कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांची ४० हजार रुपये किमतीची सिल्वर रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (क्र. MH 34 Y 1461) चोरून नेली. या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध अपहार क्रमांक ५७२/२०२६ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहितेन्वये (BNS) गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.

या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. इंचार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे व त्यांच्या पथकाने अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, गुन्हे शोध पथकाच्या गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी साहिल वसंता टेकाम (वय २० वर्षे) आणि चेतन दिनेश मिलमिले (वय २१ वर्षे, दोन्ही रा. इंदिरानगर चुनाळा, ता. राजुरा) यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी राजुरा तहसील कार्यालयातून चोरलेली सिल्वर रंगाची स्प्लेंडर मोटारसायकल तर काढून दिलीच, सोबतीने चंद्रपूर आणि तेलंगणा राज्यातील इतर भागांतून केलेल्या दुचाकी चोऱ्यांची कबुलीही दिली.

आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरलेल्या विना क्रमांकाच्या एकूण ७ मोटारसायकली हस्तगत केल्या. यात रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील (अप.क्र. ८०/२०२६) १५ हजार रुपयांची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस (MH 34 BA 7649), कोरपना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील (अप.क्र. २६०/२०२६) १८ हजार रुपयांची स्प्लेंडर प्रो (MH 34 AF 0410), आणि तेलंगणा राज्यातील वांकडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील (अप.क्र. २२०/२०२६) ४० हजार रुपयांची स्प्लेंडर प्रो (AP 01 N 6510) जप्त करण्यात आली.

याशिवाय ५० हजार रुपये किमतीची आणखी एक स्प्लेंडर प्लस (MH 33 K 1593), काळा पेंट मारलेली ५० हजार रुपयांची मोटारसायकल (MH 34 BW 4780) आणि निळा-पांढरा पट्टा असलेली ५० हजार रुपयांची हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल (AP 13 AC 4316) असा एकूण २ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींवर आता कलम ३०३(२), ३(५) भा.न्या.सं. अंतर्गत कारवाई केली जात आहे.

ही धडाकेबाज कामगिरी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली सपोनी लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, पोहवा अनुप डांगे, पोलीस अंमलदार महेश बोलगोडवार, शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी, शरद राठोड आणि राजीव दुबे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. या कारवाईमुळे दुचाकी चोरांच्या टोळीचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून परिसरातील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment