चंद्रपूर टायर चोरी प्रकरणात रामनगर पोलिसांनी जप्त केलेले अलॉय व्हील

कारसाठी पैसे कमी पडले आणि केली टायर चोरी; बालक ताब्यात

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 29, 2026

चंद्रपूर: चंद्रपूर टायर चोरी प्रकरणातील दोन गुन्हे रामनगर पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. नागपूर रोड आणि कुंदन प्लाझा चौक परिसरात दोन कार उभ्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी या दोन्ही कारचे चारही टायर अलॉय व्हीलसह लंपास केले होते. पोलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून आठ अलॉय व्हील, एक मोपेड आणि कारचा जॅक जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची किंमत १ लाख ७० हजार ५०० रुपये आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बालकाने दोन्ही चोऱ्यांची कबुली दिली आहे. (राजुऱ्यात चितळांची शिकार, वनविभागाने केली कारवाई, वाचा बातमी)

शहरातील नागपूर रोड व कुंदन प्लाझा चौक परिसरात पार्किंग करून उभ्या असलेल्या महागड्या कारचे चारही टायर अलॉय व्हीलसह चोरीस गेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आणण्यात रामनगर पोलिसांना मोठे यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीचे आठ टायर अलॉय व्हीलसह, गुन्ह्यात वापरलेली मोपेड दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा जॅक असा एकूण १ लाख ७० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे रामनगर पोलीस ठाण्यातील दाखल असलेले दोन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

चंद्रपूर टायर चोरी: बलेनो कारचे टायर लंपास

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८.०० ते दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान, तक्रारदार भूषण नारायणराव गवांडे (रा. कुंदन प्लाझा चौक, चंद्रपूर) यांनी त्यांची मालकीची मारुती सुझुकीची ब्रेझा कार नागपूर रोडवरील त्यांच्या गॅरेजसमोर पार्किंग करून ठेवली होती. या दरम्यान अज्ञात चोराने संधी साधून या कारचे चारही टायर अलॉय व्हीलसह लांबवले. या प्रकरणी तक्रारदाराच्या रिपोर्टवरून रामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशीच दुसरी घटना कुंदन प्लाझा चौकातील ए.वन कार वॉशिंग सेंटरसमोर घडली. लक्की मुबारक हुसेन अन्सारी यांच्या गॅरेजवर आलेली बलेनो कार तेथे लावली असता, अज्ञात चोरट्यांनी त्या कारचेही चारही टायर अलॉय व्हीलसह काढून नेले. याप्रकरणी देखील रामनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. १२३२/२०२६ नुसार कलम ३०३(२) भासंनूसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांनी आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांना सूचना दिल्या.

१.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

रामनगर पोलिसांचे पथक परिसरात चोरांचा शोध घेत असताना, हवेली गार्डन परिसरातील एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने कार घेण्यासाठी कमी पडलेले पैसे गोळा करण्याच्या उद्देशाने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला पालकांसमक्ष ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी केलेले एकूण आठ टायर अलॉय व्हील, गुन्ह्यात वापरलेली मोपेड दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा जॅक असा एकूण १,७०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन गुन्हे यशस्वीरित्या उघडकीस आणले आहेत.

सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे आणि पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, मंगेश शेंडे, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, प्रकाश मडावी, संदिप गेडम, सुरेश कोरवार, पंकज पोंदे, सुरज शेडमाके व ब्ल्यूटी साखरे यांनी पार पाडली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment