चंद्रपूर विसर्जन मिरवणुकीबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन देताना खासदार प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर विसर्जन मिरवणुकीला २२ व २४ ऑक्टोबरला परवानगी द्या, खासदार धानोरकर यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 12, 2026

चंद्रपूर : चंद्रपूर विसर्जन मिरवणूक २२ व २४ ऑक्टोबर रोजी काढण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन ही मागणी नोंदवली. २३ ऑक्टोबर रोजी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. त्यामुळे त्या दिवशी विसर्जन नको, असे निवेदनात नमूद आहे. नवमी व दशमीला भाविकांचे उपवास असतात. त्यामुळे २१ ऑक्टोबरला विसर्जन व महाप्रसाद करणे शक्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे. अनेक मंडळांनी आधीच खर्चाची तयारी केल्याने प्रशासनाने सहानुभूतीने विचार करावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे. (अग्नीवर भरतीत ८ हजार तरुणांचा सहभाग, वाचा हि बातमी)

चंद्रपूर विसर्जन मिरवणुकीबाबत खासदारांचे निवेदन

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, या वर्षी नवरात्रोत्सवाच्या नवमी व दशमी तिथीला भाविकांचे उपवास असल्यामुळे, विसर्जन व महाप्रसादाचे आयोजन २१ ऑक्टोबर रोजी करणे अशक्य आहे. त्यामुळे विसर्जन २२ व २४ ऑक्टोबर दरम्यान करावे, असे बहुतांश मंडळांनी निश्चित केले होते. आगामी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मंडळांनी या नियोजनानुसार हजारो रुपयांची पूर्वतयारी, महाप्रसादाचे बुकिंग आणि साहित्याची व्यवस्था केली आहे. मात्र, अचानक २१ तारखेलाच विसर्जन करण्याचे निर्देश प्रशासनाकडून आल्यामुळे, आधीच आर्थिक ताण सहन करणाऱ्या सार्वजनिक मंडळांवर आणि भाविकांच्या श्रद्धेवर मोठा आघात झाला असून मंडळांसमोर अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे.

निवडणूक दिवस वगळून परवानगीची विनंती

आगामी २३ ऑक्टोबर रोजी होणारी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आणि त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचे महत्त्व मंडळांना पूर्णपणे ठाऊक आहे. पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आणि नागरिकांचे सहकार्य यात कधीही दुजाभाव राहिला नाही. परंतु, लोकभावना आणि श्रद्धा यांचा अचूक समतोल साधत, २३ तारखेचा निवडणुकीचा दिवस पूर्णपणे वगळून, मंडळांना २२ आणि २४ ऑक्टोबर या दोन दिवशी विसर्जन करण्याची सवलत अथवा परवानगी द्यावी, ही समस्त मंडळांची आणि नागरिकांची रास्त मागणी आहे, असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात अधोरेखित केले आहे.

पोलीस प्रशासनाने सर्व सार्वजनिक उत्सव मंडळांना विश्वासात घेऊन, त्यांच्या या भावनिक व आर्थिक अडचणींचा अभ्यासपूर्ण व सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि २२ व २४ तारखेला विसर्जन मिरवणूक पार पाडण्यासाठी लवकरात लवकर परवानगी द्यावी, अशी विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. या प्रशासकीय निर्णयामुळे उत्सव अत्यंत शांततेत, शिस्तीत आणि उत्साहात संपन्न होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment