भाऊचा दांडिया चंद्रपूर येथे रास नृत्य सादर करणारे युवक-युवती

चंद्रपुरात ‘भाऊचा दांडिया २०२६’ ला उत्साहात सुरुवात: २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस फुटबॉल ग्राउंडवर रोज आयोजन

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 12, 2026

चंद्रपूर : भाऊचा दांडिया चंद्रपूर शहरात उत्साहात सुरू झाला आहे. मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवाराच्या वतीने या रास नृत्य उत्सवाचे आयोजन झाले आहे. हा उत्सव ११ ते २० ऑक्टोबर २०२६ दरम्यान रोज सायंकाळी ७ ते १० या वेळेत होईल. ठिकाण पोलीस फुटबॉल ग्राउंड, तुकूम रोड, चंद्रपूर आहे. स्पर्धकांसाठी पारितोषिके, रिल्स स्पर्धा, फूड स्टॉल्स आणि दररोज लकी ड्रॉ असे उपक्रम आहेत. (विसर्जन मिरवणुकीच्या तारखांत बदल करा – खासदार धानोरकर, वाचा हि बातमी)

भाऊचा दांडिया चंद्रपूर: ११ ते २० ऑक्टोबर दरम्यान रोज आयोजन

या उत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार देवराव भांडेकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी दिवंगत माजी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या लोककल्याणकारी कार्याला व सामाजिक योगदानाला उजाळा देत, “दिवंगत माजी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रेरणा व कार्य हे युवकांसाठी सदैव दिशादर्शक आहे. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असली, तरी दांडियाच्या माध्यमातून चंद्रपूरकरांना एक समृद्ध सांस्कृतिक वारसा त्यांनी दिला आहे,” असे प्रतिपादन केले. तसेच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय यांनी हा दांडिया उत्सव सलग ५ व्या वर्षी कसा यशस्वीपणे प्रस्थापित झाला, हे सांगताना “युवकांना एकाच मंचाखाली आणण्यासाठी व त्यांच्यात एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी या स्पर्धेच्या आयोजनाची सुरुवात केली होती,” अशी आठवण यावेळी व्यक्त केली.

मान्यवरांची उपस्थिती, खासदार प्रतिभा धानोरकर अनुपस्थित

या सोहळ्यास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनायक बांगडे, प्रवीण पडवेकर, सुभाष गौर, डॉ. सुरेश महाकुलकर, सूर्यकांत खनके, ओबीसी नेते सचिन राजूरकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष शामकांत थेरे, चंद्रपूर ग्रामीण तालुकाध्यक्ष अनिल नरुले, प्रशांत काळे, सुरज गावंडे, विनोद अहिरकर, चंद्रपूर महापालिकेचे काँग्रेस गटनेते सुरेंद्र अडबाले, माजी शहर अध्यक्ष संतोष लहामंगे, झोन सभापती तथा नगरसेवक रामनरेश यादव, माजी महापौर तथा नगरसेविका संगीता अमृतकर, नगरसेविका सुनंदा धोबे, नगरसेविका महानंदा वाळके, वनश्री मेश्राम, नगरसेविका सईदा बेगम ताजु शेख, नगरसेविका वैशाली महाडोळे, नगरसेविका शीला सिडाम, नगरसेविका साफिया तवांगर खान, नगरसेवक राहुल घोटेकर, नगरसेवक सुनील खंडेलवार, नगरसेवक अजय बल्की, नगरसेवक विनोद लभाणे, नगरसेवक आकाश मानकर यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते प्रमुख संख्येने उपस्थित होते.

सर्व पाहुण्यांचे स्वागत प्रवीण काकडे, मानस धानोरकर व पार्थ धानोरकर यांनी केले. 

या भव्य उत्सवाच्या मुख्य आयोजक तथा खासदार प्रतिभा धानोरकर यांना दिल्लीत सुरू असलेल्या एका महत्त्वाच्या आंदोलनामुळे तात्काळ तेथे जावे लागल्याने त्या प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्या नाहीत; मात्र त्यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त करत चंद्रपूरकरांना उत्सवासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

या उत्सवात सहभागी होऊन उत्कृष्ट नृत्य सादर करणाऱ्या स्पर्धकांसाठी लाखोंची आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय विशेष रिल्स स्पर्धा, खवय्यांसाठी लाईव्ह फूड स्टॉल्स आणि प्रेक्षकांसाठी दररोज लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवरात्रीच्या या पावन पर्वात चंद्रपूर व परिसरातील सर्व नागरिक, युवक-युवती आणि गरबा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment