चंद्रपूर: चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ या जटपुरा युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे खोटे असल्याचा दावा मंडळाने केला आहे. हे गुन्हे तातडीने रद्द करावेत, अशी मागणी अध्यक्ष दीपक बेले, सचिव महेश बेले आणि खजिनदार बाळकृष्ण वैरागडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. रामनगर पोलीस निरीक्षकांच्या भूमिकेची वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी व्हावी, असेही मंडळाने म्हटले आहे. अनंत चतुर्दशीला, २५ सप्टेंबर रोजी निघालेल्या विसर्जन मिरवणुकीनंतर हा वाद निर्माण झाला. (चंद्रपूर महाश्रमदान मोहीम, गावागावातील नागरिकांचा पुढाकार)
मिरवणूक लांबल्याने दुपारी निघण्याचा निर्णय पूर्वसूचना देऊन घेतल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. पोलिसांची बाजू अद्याप स्पष्ट झालेली नाही. यासंदर्भात मंडळाचे अध्यक्ष दीपक बेले, सचिव महेश बेले आणि खजिनदार बाळकृष्ण वैरागडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. नियम सर्वांसाठी सारखे आहे, इतर मंडळांना यामुळे विलंब झाला, २५ सप्टेंबरची परवानगी असताना दुसऱ्या दिवशी विना परवाना मिरवणूक निघाल्याने सदर गुन्हा दाखल झाला असल्याची प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिली आहे.
चंद्रपूरचा राजा गणेश मंडळची नेमकी मागणी काय?
सन १९७४ मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाचा इतिहास तब्बल ५२ वर्षांचा असून, सामाजिक, धार्मिक व आरोग्यविषयक उपक्रमांसाठी हे मंडळ ओळखले जाते. २९ फुटांची भव्य व विलोभनीय मातीची मूर्ती हे ‘चंद्रपूरच्या राजा’चे मुख्य आकर्षण असते. यंदाच्या गणेशोत्सवात २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ११ वाजता जल्लोषात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. जटपुरा गेटमार्गे जटपुरा गेट परिसरामध्ये भव्य स्वागत आणि पारंपरिक आतिषबाजी झाल्यानंतर मिरवणूक पुढे सरकली. मात्र, कस्तुरबा रोडवर पोलिसांनी मिरवणुका वेळेत पुढे न सोडल्यामुळे आणि वाहतूक व पोलीस बंदोबस्ताच्या नियोजनातील अभावामुळे मिरवणूक प्रचंड लांबली, असा थेट आरोप मंडळाने केला आहे.
पहाटेच्या सुमारास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी इरई नदीवरील विसर्जन कुंडाला भेट देऊन पाहणी केली असता, तेथे आधीच ३० ते ३५ मोठ्या मूर्ती विसर्जनाच्या प्रतीक्षेत होत्या. तसेच कुंडाची स्वच्छता करण्यासाठी सुमारे दोन तासांचा वेळ लागणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. याशिवाय, विसर्जन मार्गावर सेंट मायकेल, चांदा पब्लिक, महर्षी, पोदार आणि इंदिरा गांधी गार्डन शाळांसह मुख्य बाजारपेठ असल्याने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. ही वाहतूक कोंडी टळावी आणि प्रशासनाला सहकार्य व्हावे याच हेतूने, तसेच प्रशासनाशी चर्चा करून मंडळाने दुपारी विसर्जनासाठी निघण्याचा निर्णय घेतला.
कस्तुरबा रोडवरील मिरवणूक आणि वाहतूक नियोजनाचा आरोप
या सर्व घडामोडींची आणि निर्णयाची पूर्वसूचना पोलीस विभागाला दुपारी १२:३० आणि ३:०० वाजता देण्यात आली होती. त्यानंतर दुपारी ३ वाजता शांततेत व कोणत्याही गंभीर वाहतूक अडथळ्याशिवाय मूर्ती विसर्जन स्थळाकडे रवाना करण्यात आली. विसर्जन स्थळी पोहोचल्यानंतर विधीवत पूजा अर्चा करून मूर्तीवरील चांदीचे दागिने व वस्तू सुरक्षित काढण्यासाठी एक तास लागला आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने विधीवत विसर्जन पूर्ण करण्यात आले.
असे असतानाही, प्रशासनाला पूर्ण सहकार्य करणाऱ्या आणि पहाटेपासूनच संपर्कात असलेल्या मंडळाची कोणतीही बाजू ऐकून न घेता तसेच वस्तुस्थितीची पडताळणी न करता रामनगर पोलीस निरीक्षकांनी जाणीवपूर्वक मंडळावर खोटे गुन्हे दाखल केले, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, मंडळाची विनाकारण नाहक बदनामी झाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणी कस्तुरबा रोडवरील वाहतूक नियोजनातील त्रुटी, विसर्जन कुंडावरील गर्दीची परिस्थिती, पोलीस विभागाला दिलेल्या पूर्वसूचनेचे दूरध्वनी रेकॉर्ड आणि रामनगर पोलीस निरीक्षकांची भूमिका या सर्वांची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. तसेच, भावी काळात अशा प्रकारचा गोंधळ टाळण्यासाठी महानगरपालिका, पोलीस आणि गणेश मंडळांमध्ये प्रभावी समन्वयाची यंत्रणा उभी करावी, अशी मागणीही ‘चंद्रपूरचा राजा’ जटपुरा युवक गणेश मंडळाने केली आहे.
चंद्रपूरचा राजा मंडळ कार्यकर्त्यांच्या आरोपावर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी प्रतिक्रिया दिली कि, नियम हे सर्वांसाठी एकच होते, चंद्रपूरचा राजा मंडळाची मिरवणूक निघाली मात्र त्यांच्यामुळे इतर गणेश मंडळाची वाट अडली होती. चंद्रपूरचा राजा जटपुरा युवक गणेश मंडळाला २५ सप्टेंबर ची परवानगी दिली होती, मात्र त्यांनी दुसऱ्या दिवशी विना परवानगीने मिरवणूक काढली. गुन्हा दाखल हा नियमांचे उल्लन्घ झाले म्हणून दाखल झाला.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






