पडोली/चंद्रपूर : पडोली गोवंश वाहतूक प्रकरणी पोलिसांनी पाठलाग करून एक आयचर ट्रक पकडल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत ट्रकमधून २८ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी वाहन, जनावरे आणि मोबाईल असा एकूण २१ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे वृत्तात नमूद आहे. ही कारवाई पडोली चौकाजवळ सुरू झाली आणि पुढे वरोडा गावाच्या परिसरात ट्रक थांबवण्यात आला. या प्रकरणी ट्रकचालकाला अटक करून संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (विनापरवाना डीजे वाजला, पोलिसांनी केली जप्तीची कारवाई, वाचा हि बातमी)
पडोलीत संशयित गोवंश वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पडोली पोलीस ठाण्याचे पथक पडोली चौकासमोर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत होते. त्याचवेळी एका आयचर ट्रकमधून गोवंशाची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली. काही वेळातच चंद्रपूरकडून इरई नदी मार्गाने येणारा एक लाल रंगाचा व निळ्या ताडपत्रीने झाकलेला ६ चाकी आयचर ट्रक (क्र. MH-28-BB-4970) येताना दिसला. पडोली चौकाजवळ पोलिसांनी चालकाला हात दाखवून वाहन रस्त्याच्या बाजूला थांबवण्याचा इशारा केला. मात्र, पकडले जाण्याच्या भीतीने चालकाने गाडी थांबवण्याऐवजी थेट एका पेट्रोल पंपाच्या आवारातून यु-टर्न घेतला आणि विरुद्ध दिशेने (राँग साईड) अतिवेगाने ट्रक पळवला.
ट्रकमधून २८ गोवंशीय जनावरांची सुटका
चालकाने कोसारा फाटा चौकातून देवाडा मार्गे वेंडली आणि पुढे राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरोडा गावाच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी तत्काळ वाहनाचा पाठलाग सुरू केला आणि वरोडा गावातील रस्त्यावर अडथळा निर्माण करून ट्रक थांबवण्यास भाग पाडले. वाहन थांबताच चालक गाडी जागेवरच सोडून शेतात पळून जाऊ लागला; मात्र दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने शिताफीने पाठलाग करून त्याला शेतशिवारात पकडले. वाहनाची बारकाईने पाहणी केली असता त्यात अमानुषपणे कोंबून भरलेली २८ जिवंत गोवंशीय जनावरे (बैल व गायी) आढळून आली.
पोलिसांनी तात्काळ वाहनासह जनावरांना ताब्यात घेतले असून १ लाख ८३ हजार रुपये किमतीची २८ जनावरे, २० लाख रुपयांचा टाटा कंपनीचा आयचर ट्रक आणि १० हजार रुपयांचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण २१ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी ट्रक चालक अब्दुल हफिज गुफ्रान खान (वय ३३, रा. वार्ड क्र. ०४, कुरेशी मोहल्ला, गडचांदूर) याला अटक करण्यात आली आहे.
आरोपीविरुद्ध पडोली पोलीस ठाण्यात अप. क्र. ३१६/२०२६ अन्वये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारीत २०१५) च्या कलम ५(१), ५(ब), ९, ११ सह प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक कायदा १९६० चे कलम ११(१)(ड) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १३२/१७९, १८४ नुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर धडक कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पडोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोकोडे, पोलीस हवालदार विनोद वानकर, पोलीस अमंलदार धिरजकूमार लोधी, समीर खाडे, श्रिनीवास वाभीटकर आणि धिरज भोयर यांच्या पथकाने पार पाडली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






