दुर्गापूर – दुर्गापूर विनापरवाना डीजे प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत १ लाख ८० हजार रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. वाढदिवसानिमित्त सार्वजनिक रस्त्यालगत मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याचा आरोप आहे. ही घटना ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी दुर्गापूर ते चंद्रपूर मुख्य रस्त्यावर घडली. पोलिसांनी संबंधित डीजे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवण्यासाठी आवश्यक परवाना मागितल्यावर तो उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी नमूद केले. या प्रकरणाचा पुढील तपास दुर्गापूर पोलीस करत आहेत. सूरज विजय पंडित (वय ३१, रा. जलनगर वार्ड, उडिया बस्ती, चंद्रपूर) असे कारवाई करण्यात आलेल्या डीजे चालकाचे नाव आहे. (बनावट इंस्टाग्राम खाते, महिलेची बदनामी, गुन्हा दाखल, वाचा बातमी)
दुर्गापूर विनापरवाना डीजे प्रकरण नेमके काय?
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास दुर्गापूर पोलीस ठाण्याचे पथक परिसरात रात्रगस्त घालत होते. त्याचवेळी ‘डायल ११२’ वर कार्यरत असलेले पोलीस हवालदार सुनील कामतकर यांनी गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक रवींद्र नक्कनवार यांना फोन करून दुर्गापूर मुख्य रस्त्यावर एका वाढदिवसानिमित्त अत्यंत तीव्र आवाजात डीजे सुरू असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथकाने दुर्गापूर ते चंद्रपूर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील आनंद चाय सेंटरजवळ धाव घेतली. त्यावेळी रस्त्यालगत बेकायदेशीरपणे आणि कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात डीजे सुरू असल्याचे पोलिसांना दिसून आले.
पोलिसांनी डीजे चालक सूरज पंडित याच्याकडे सार्वजनिक रस्त्यावर डीजे वाजवण्याच्या शासकीय परवान्याची मागणी केली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ध्वनी प्रदूषण व डीजे वापरावर निर्बंध लावणारे कडक आदेश जारी केलेले असतानाही या डीजे चालकाने प्रशासकीय आदेशांचे सर्रास उल्लंघन केले. त्यामुळे पोलिसांनी दोन पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करून १ टॉप, २ बेस, एनएक्सआरडीओ १८०१ बेस मशीन, आरएक्स ४००० बेस मशीन, ८०१ एचएफ मशीन, दास्का २६० प्रोसेसर आणि डायनाटेक ८५० प्लेयर विथ मिक्सर मशीन असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
शासकीय आदेशांचा अवमान करणे आणि ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडीत काढल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र नक्कनवार यांच्या तक्रारीवरून आरोपी सूरज पंडित याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २२३ सह महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३६ व ७० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस हवालदार गजानन भांडारकर करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






