चंद्रपूर – चंद्रपूर रुग्णालय सुविधा सुधारण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात शौचालये आणि पिण्याचे पाणी २४ तास उपलब्ध ठेवण्याची मागणी करण्यात आली. मनसे पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर प्रशासनाकडे या समस्यांचा पाठपुरावा केला. येत्या चार दिवसांत काम सुरू न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. रुग्ण, महिला, वृद्ध नागरिक आणि नातेवाईकांची गैरसोय दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. (४० हजाराची लाच घेताना कृषी सहायक ACB च्या जाळ्यात)
चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात रुग्णांना आणि त्यांच्यासोबत थांबणाऱ्या नातेवाईकांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या अभावावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून, रुग्णालयातील शौचालये व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था २४ तास सुरू ठेवण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.
चंद्रपूर रुग्णालय सुविधा सुधारण्याची मनसेची मागणी
चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दररोज मोठ्या संख्येने दूरदूरवरून रुग्ण दाखल होत असतात आणि त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही रात्रंदिवस परिसरात थांबतात. मात्र, रात्रीच्या वेळी रुग्णालयातील सार्वजनिक शौचालये बंद ठेवली जात असल्यामुळे रुग्ण, महिला, वृद्ध नागरिक व नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. दरम्यान, मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन शौचालयांच्या परिसराची पाहणी केली असता, तेथील दरवाजे बंद आणि कुलूपबंद असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार पाहून मनसे पदाधिकारी चांगलेच संतापले आणि त्यांनी तत्काळ तेथील कुलूप काढायला लावले.
याशिवाय, रुग्णालय परिसरात २४ तास स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असणे अत्यंत गरजेचे असताना, पाण्याची सोय नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी वणवण भटकत बाहेर जावे लागत असल्याचे समोर आले. या गंभीर समस्येची तातडीने दखल घेत मनसेच्या वतीने प्रशासनाला जाब विचारण्यात आला असून, रुग्णालयातील सार्वजनिक शौचालये दिवस-रात्र २४ तास खुली ठेवावीत, परिसरात पिण्याच्या पाण्याची चोवीस तास सोय करावी, शौचालयांची नियमित स्वच्छता राखावी आणि नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
येत्या चार दिवसांत या कामाला सुरुवात न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. या संपूर्ण पाहणी व आंदोलनात्मक भूमिकेच्या वेळी मनसेचे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, तालुका उपाध्यक्ष प्रवीण शेवते, विभाग अध्यक्ष राजू देवांगन आणि प्रवीण भीमनवार यांच्यासह अनेक मनसैनिक उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






