WCL Majri Workers Strike protest in rain by MNS Kamgar Sena

मुसळधार पावसातही मनसे कामगार सेनेचा एल्गार सुरू; कामगार बसणार आमरण उपोषणाला

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 12, 2026

माजरी : WCL Majri Workers Strike संदर्भात पाच दिवस उलटूनही प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने कंत्राटी चालक आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. मुसळधार पावसामुळे आंदोलनस्थळाचा मंडप आणि गाद्या पूर्णपणे भिजल्या आहेत. तरीही कामगार पावसात ठिय्या देऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन पुढे नेत आहेत. (हे हि वाचा – ५० एकरात भव्य मेडिकल हब)

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) माजरी एरिया येथील कामगार आणि कंत्राटी वाहनचालकांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस पूर्ण झाला. मात्र, पाच दिवस उलटूनही कामगारांच्या प्रमुख मागण्यांवर प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने अद्याप कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.

पावसात भिजत आंदोलनकर्त्यांचा संघर्ष सुरू

आज माजरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आंदोलनस्थळाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. संपूर्ण परिसरात पाणी साचल्याने आंदोलनस्थळाचा मंडप, गाद्या आणि इतर साहित्य पूर्णपणे भिजून गेले. अंगावर कोसळणाऱ्या पावसात भिजूनही आपल्या न्याय्य हक्कांसाठी चालक व कामगार ठामपणे आंदोलनस्थळी बसून आहेत.

अंधार आणि विषारी प्राण्यांचे सावट; मूलभूत सुविधांचा अभाव

याहून धक्कादायक बाब म्हणजे आंदोलनस्थळी रात्रीच्या वेळी प्रकाशाची (विद्युत) कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. अंधारामुळे परिसरात साप, विंचू, खेकडे आणि उंदरांचा वावर वाढला असून आंदोलनकर्त्यांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. गाद्या ओल्या झाल्यामुळे कामगारांना रात्री विश्रांती घेणेही अशक्य झाले आहे. कामगारांच्या मागण्या सोडवण्याऐवजी त्यांना साध्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्यामुळे प्रशासन आणि WCL व्यवस्थापनाविरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे.

आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सहन करणार नाही: अमन अंधेवार

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी व्यवस्थापनाच्या या भूमिकेवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. “कामगारांच्या मागण्या अत्यंत रास्त आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून आंदोलन दडपण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. कामगारांचे प्रलंबित वेतन, योग्य वेतनदर, PF आणि ESIC ची अंमलबजावणी, ८ तासांची ड्युटी, कामावरून कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घेणे आणि कंत्राटदारांच्या मनमानीवर लगाम लावणे या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी त्यांनी लावून धरली.

उद्यापासून आमरण उपोषण; आंदोलनाला नवे वळण

मागण्यांवर निर्णय न झाल्यामुळे हे आंदोलन आता आणखी आक्रमक वळणावर पोहोचले आहे. १२ सप्टेंबर रोजी मनसे कामगार सेनेच्या वतीने संबंधित प्रशासन आणि उच्च अधिकाऱ्यांना अधिकृत निवेदन देण्यात येणार असून, १३ सप्टेंबरपासून दोन कामगार आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रशासनाने त्वरित सकारात्मक चर्चा करून तोडगा न काढल्यास हे आंदोलन अधिक उग्र रूप धारण करेल, असा सज्जड इशारा संघटनेने दिला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment