WCL Land Acquisition बैठकीत प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर-यवतमाळ वेकोली जमीन संपादन व आश्रितांच्या नोकरीसाठी प्रतिभा धानोरकर आक्रमक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 10, 2026

चंद्रपूर : WCL Land Acquisition संदर्भातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नागपूर येथे वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमीन संपादनाचा प्रश्न, आश्रितांना नोकरी, तसेच वेकोली कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने प्रभावित शेतकरी आणि कामगारांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड च्या विविध कोळसा खाण क्षेत्रांत गेलेल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन आणि वेकोली कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत खासदार प्रतिभा धानोरकर यांची नागपूर येथे वेकोलीचे अध्यक्ष तथा सहप्रबंधक संचालक यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी केली. (मुनगंटीवारांमुळे चिमुकलीला मिळाले नवजीवन)

WCL Land Acquisition बैठकीत कोणते मुद्दे मांडले?

या बैठकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या वणी क्षेत्रातील मौजा गाडेगाव, विरुर, खैरगाव, उकणी, बेलोरा, वणी नॉर्थ क्षेत्र तसेच कोलारपिंपरी, घोन्सा आणि बल्लारपूर क्षेत्रातील गौरी तसेच माजरी व एकोना परिसरातील शेतकऱ्यांचा प्रश्न प्रामुख्याने लावून धरला. या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वेकोली प्रकल्पांतर्गत अद्यापही पूर्णपणे संपादित झालेल्या नाहीत. या शिल्लक राहिलेल्या जमिनी तातडीने संपादित करून संबंधित शेतकऱ्यांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून द्यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वेकोलीने आधीच संपादित केल्या आहेत, परंतु त्यांच्या कुटुंबातील आश्रितांना अद्यापही नियमानुसार नोकरी देण्यात आलेली नाही, अशा सर्व पात्र उमेदवारांना तातडीने वेकोलीमध्ये नोकरी देण्यात यावी, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी लावून धरली.

त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वेकोलीने संपादित केल्या आहेत, परंतु ५ वर्षांचा कालावधी पूर्ण होऊनही काही घरगुती किंवा कौटुंबिक कारणास्तव त्यांच्या आश्रितांना नोकरी लागू शकली नाही, अशा विशेष प्रकरणांमध्ये प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी एकदा पुन्हा संधी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासोबतच, वेकोलीमध्ये रात्रंदिवस राबणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवरही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष न करता प्रशासनाने त्यांच्या मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वेकोली व्यवस्थापनाला सांगितले.

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या आग्रही भूमिकेनंतर, वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या प्रशासनाने चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रलंबित समस्यांवर अत्यंत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. 

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment