handrapur Industrial Security Meet दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि पोलीस अधिकारी.

चंद्रपुरातील उद्योगांवर दबाव टाकणाऱ्यांवर थेट कारवाई

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 19, 2026

चंद्रपूर: Chandrapur Industrial Security Meet च्या माध्यमातून जिल्हा पोलीस प्रशासनाने स्थानिक उद्योगांना सुरक्षित वातावरण पुरवण्यासाठी कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ही विशेष बैठक पार पडली.

या बैठकीत जिल्ह्यातील वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडसह (WCL) सुमारे १०० हून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भंगार चोरी रोखणे आणि खंडणीखोरांना चाप लावणे यावर बैठकीत सविस्तर रणनीती आखण्यात आली. (हे हि वाचा – बुद्ध विहार आंदोलन यशस्वी, खासदार धानोरकर यांची मध्यस्थी)

Chandrapur Industrial Security Meet: १०० हून अधिक कंपन्यांशी पोलिसांचा थेट संवाद

जिल्ह्यातील औद्योगिक विकास, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कंपन्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करत पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी चोरी, भंगार तस्कर आणि खंडणीखोरांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. तुकुम रोड येथील पोलीस सभागृहात जिल्ह्यातील वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (WCL), विविध औद्योगिक प्लांट्स आणि कंपन्यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण विशेष आढावा बैठक पार पडली. या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल बारापत्रे, रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, दुर्गापूरचे पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर, पडोलीचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोकोडे यांच्यासह जिल्ह्यातील सुमारे १०० कंपन्यांचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.

WCL आणि औद्योगिक पट्ट्यात रात्रंदिवस वाढणार पोलिसांची गस्त

बैठकीत औद्योगिक परिसरातील कायदा-सुव्यवस्था, वाढती भंगार चोरी, कामगारांची सुरक्षा, वाहतूक कोंडी आणि कंपन्यांवर टाकला जाणारा बेकायदेशीर दबाव यावर अत्यंत सखोल व रोखठोक चर्चा झाली. WCL सह इतर कंपन्यांच्या परिसरातील चोरीच्या घटना रोखण्यासाठी संबंधित ठाण्यांच्या हद्दीत रात्रंदिवस गस्त वाढवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असून सर्व संवेदनशील ठिकाणी पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. याशिवाय ब्रह्मपुरी ओव्हरब्रिज परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त वाहतूक पोलीस कर्मचारी आणि बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

कामगारांच्या सुरक्षिततेबाबत अत्यंत गंभीर भूमिका मांडताना अपघाताच्या वेळी त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा म्हणून सर्व कंपन्यांना कामगारांचा विमा उतरवणे बंधनकारक असल्याचे निर्देशित करण्यात आले. यावेळी ‘धारिवाल कंपनी’ने कामगारांचे बँक खाते उघडतानाच विमा जोडल्याचे तर ‘डालमिया सिमेंट’ने पहिल्याच दिवसापासून विमा संरक्षण दिल्याचे उदाहरण देत इतर आस्थापनांनीही अशा कल्याणकारी धोरणांचे तात्काळ अनुकरण करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच कामगारांकडून हेल्मेट व इतर सुरक्षा नियमांचे पालन व्हावे यासाठी जिल्हा वाहतूक शाखेतर्फे औद्योगिक आस्थापनांमध्ये विशेष प्रबोधन मोहीम राबवण्यात येणार आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कामगारांना हाताशी धरून कंपनी व्यवस्थापनाला धमकावणे, खंडणी उकळणे किंवा अनुचित दबाव आणण्याचे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिला. अशा प्रकारचा कोणताही दबाव आल्यास कंपन्यांनी न घाबरता थेट पोलिसांशी संपर्क साधावा; अशा प्रवृत्तींवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. उद्योगांना सुरक्षित वातावरण पुरवणे आणि कामगारांचे हित जोपासणे हे प्रशासनाचे मुख्य ध्येय असून पोलीस आणि कंपन्यांमध्ये नियमित समन्वय राखला जाईल, असे सांगत कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी तर आभार प्रदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी केले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment