चंद्रपूर/मुंबई: विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण हा नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत गंभीर आणि जीवघेणा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर, युवासेना प्रमुख व माजी पर्यावरण मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी एक विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी दोन्ही जिल्ह्यांतील वाढत्या प्रदूषण पातळीचा सखोल आढावा घेतला. (वेकोली प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या कधी, खासदार आक्रमक)
Chandrapur Pollution Issue वर मातोश्रीत नेमकी काय चर्चा झाली?
या बैठकीदरम्यान आदित्य ठाकरे यांनी चंद्रपूरचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत विजय सहारे यांच्याकडून दोन्ही जिल्ह्यांतील औद्योगिकीकरण, कोळसा खाणी आणि इतर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच, या भागातील पर्यावरणाचे संरक्षण नेमके कसे करता येईल आणि नागरिकांना या त्रासातून कशी मुक्ती मिळवून देता येईल, या संदर्भात उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील या गंभीर समस्येवर आता युवासेना आक्रमकपणे आवाज उठवणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
समस्या जनतेसमोर आणून त्यांचे निराकरण करा: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही उपस्थित पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या कार्यक्षेत्रात उद्भवत असलेल्या स्थानिक समस्या आणि नागरिकांचे प्रश्न आपल्या पक्षाच्या व माध्यमांच्या माध्यमातून प्रभावीपणे लावून धरा, असे त्यांनी सांगितले. केवळ समस्या मांडून न थांबता, शासनावर आणि प्रशासनावर दबाव आणून त्याचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी मैदानात उतरा, असा मौल्यवान सल्ला पक्षप्रमुखांनी यावेळी जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे व इतर पदाधिकाऱ्यांना दिला.

युवासेना दोन्ही जिल्ह्यांत तीव्र संघर्ष करणार
चंद्रपूर जिल्ह्यातील औष्णिक वीज केंद्र, सिमेंट कारखाने आणि कोळसा खाणींमुळे हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली आहे, तर गडचिरोली जिल्ह्यातही नवीन औद्योगिक प्रकल्पांमुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला आहे. या जीवघेण्या प्रदूषणाविरुद्ध आता युवासेना सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे.
या विशेष बैठकीला युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत विजय सहारे यांच्यासह चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि युवा सैनिक उपस्थित होते. ‘मातोश्री’वरून मिळालेल्या या ताकदीमुळे आगामी काळात दोन्ही जिल्ह्यांत पर्यावरण संरक्षणासाठी युवासेना एक मोठी चळवळ उभारणार असल्याचे संकेत मिळत आहेत.