चंद्रपूर: घुघूस ट्रक जाळपोळ प्रकरणातील चार फरार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. घुघूस पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) संयुक्त पथकाने ही कारवाई केली. हा प्रकार २९ सप्टेंबर २०२६ च्या रात्री नकोडा ते बहिरांबाबा मंदिर दरम्यानच्या डंपर रोडवर घडला. काही जणांनी ट्रक अडवून चालकाला खाली उतरवले आणि ट्रकला आग लावली. पोलिसांनी ९ आणि १० ऑक्टोबर २०२६ रोजी चारही आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपास घुघूस पोलीस करत आहेत. (मकोका गुन्ह्यातील ५ आरोपी फरार, वाचा हि बातमी)
घुघूस ट्रक जाळपोळ : २९ सप्टेंबरच्या रात्री काय घडले?
प्राप्त माहितीनुसार, गत २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास नकोडा ते बहिरांबाबा मंदिर दरम्यान असलेल्या डंपर रोडवर काही अज्ञात इसमांनी केव्हीआर (KVR) कंपनीचा ट्रक (क्रमांक MH 34 CQ 3385) अडवला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी ट्रक चालकाला बळजबरीने खाली उतरवले आणि सदर ट्रकला आग लावून मोठे नुकसान केले. चालकाच्या तोंडी फिर्यादीवरून पोलीस स्टेशन घुघूस येथे अपहार क्रमांक २९७/२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२६(f), १२६(२), ३(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता.
गुन्हा घडल्यापासून सर्व आरोपी फरार असल्याने पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान होते. मात्र, घुघूस पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने गुप्त माहितीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कसून शोधमोहीम राबवली. या तांत्रिक व गोपनीय तपासाच्या आधारे मिळालेल्या अचूक माहितीवरून, दिनांक ९ आणि १० ऑक्टोबर २०२६ रोजी संयुक्त कारवाई करत पोलिसांनी चारही मुख्य आरोपींना जेरबंद केले आणि हा गंभीर गुन्हा उघडकीस आणला. समशेर मेहबूब शेख, खुर्शीद इकराम खान, आफताब नफिस अहेमद आणि इरफान रफिक शेख अशी अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींची नावे आहेत.
सदर उल्लेखनीय कामगिरी चंद्रपूर पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये व पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) रवींद्र वाघ, पोलीस हवालदार अनिल बैठा, राकेश तुराणकर, विशाल हूड, तसेच पोलीस अंमलदार महेश भोयर, प्रसन्ना डोरलीकर, पवन डाखरे, रवींद्र शेंडे आणि तोताराम ठाकरे यांनी पार पाडली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचा पुढील कायदेशीर तपास घुघूस पोलिसांकडून सखोलपणे सुरू आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







2 thoughts on “ट्रक पेटवणारे चार आरोपी अटकेत, पोलिसांची संयुक्त कारवाई”