घुग्घुस ट्रक जाळपोळ प्रकरणातील आरोपींना अटक करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक

घुग्घुस ट्रक जाळपोळ : रोजगाराच्या नाराजीतून कट, दोघांना अटक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 10, 2026

चंद्रपूर – घुग्घुस ट्रक जाळपोळ प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण चार जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १० वाजता घुग्घुस ओपनकास्ट खदानाजवळ कोळसा वाहतूक करणारा ट्रक अडवण्यात आला. त्यानंतर पेट्रोल टाकून तो पेटवण्यात आला. काम आणि रोजगारासंबंधीच्या नाराजीतून हा कट रचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. (चंद्रपुरात गांजा जप्त, वाचा हि बातमी)

घुग्घुस ट्रक जाळपोळ : खदानाजवळ रात्री नेमके काय घडले?

घुग्घुस पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घुग्घुस ओपनकास्ट खदानाजवळ कोळसा वाहतूक करणारा महिंद्रा ट्रक क्रमांक एमएच ३४ सीक्यू ३३८५ अज्ञात व्यक्तींनी अडवला. त्यानंतर आरोपींनी पेट्रोलचा वापर करून या ट्रकला आग लावून दिली. या घटनेबाबत ट्रकचालक रमाकांत बाबूलाल सिंह (वय ३५ वर्षे, रा. नकुनी, ता. बेहारी, जि. सहडोल, मध्य प्रदेश) यांनी दिलेल्या तक्रारीवरून घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३२६ (फ), १२६ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली.

तांत्रिक विश्लेषणातून आरोपींपर्यंत पोहोचली स्थानिक गुन्हे शाखा

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कसून तपास केला. या तपासादरम्यान पोलिसांनी खुर्शीद उर्फ फरदीन इक्रम शेख (वय २६ वर्षे, रा. शास्त्रीनगर वॉर्ड क्र. १, घुग्घुस) आणि समशेर महेबूब शेख (वय २९ वर्षे, रा. अमराई वॉर्ड, घुग्घुस) या दोघांना अटक केली आहे. तसेच सखोल चौकशीत इरफान शेख (रा. श्रीराम वॉर्ड, घुग्घुस) आणि अफताब नफीस शेख (रा. अमराई वॉर्ड, घुग्घुस) यांचाही या कृत्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी संगनमत करून ट्रकला आग लावल्याची कबुली दिली असून, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी घुग्घुस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकर, पोलीस हवालदार सतीश अवधरे, इम्रान खान, लालू यादव, संदीप कांबळे, हिरालाल गुप्ता, पोलीस अंमलदार किशोर वाकडे, शशांक बदाम तसेच सायबर पोलीस स्टेशनचे कार्तिक खनके, अनिमेश व गुणवंत यांनी सहभाग घेतला होता. प्रकरणाचा पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment