चंद्रपूर: Chandrapur Cattle Smuggling Action अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पडोली आणि भद्रावती परिसरात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पाठलाग करून एक १० चक्का टाटा ट्रक ताब्यात घेतला. या वाहनातून ३१ गायी आणि ४ बैल असे ३५ गोवंश मुक्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी या कारवाईत एकूण २२ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान ट्रकासह २२ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (हे हि वाचा – बस स्थानकावर चोरी, नागपूरच्या महिलांना अटक)
पडोली नाकाबंदी ते थरारक पाठलाग
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर उपविभाग पथकाला पो.स्टे. पडोली हद्दीतून एका १० चक्का टाटा ट्रकद्वारे (क्रमांक MH 31 CV 0817) मोठ्या प्रमाणावर गोवंश प्राण्यांची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने पडोली हद्दीत तातडीने नाकाबंदी लावली. पोलिसांची नाकाबंदी दिसताच चालकाने ट्रक न थांबवता वेगाने भद्रावतीच्या दिशेने पळ काढला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ आपल्या वाहनाने ट्रकाचा पाठलाग सुरू केला.
सुमारे काही किलोमीटरचा थरारक पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी भद्रावती येथील जुना सुमठाणा, सब स्टेशन पावर ग्रेडजवळ ट्रक घेराव घालून यशस्वीरीत्या रोखला. पोलिसांनी ट्रकाची तपासणी केली असता, त्यामध्ये ३१ गायी व ४ बैल अशा एकूण ३५ गोवंशांना अतिशय निर्दयतेने आणि क्रूरपणे डांबून ठेवल्याचे निष्पन्न झाले.
या धडक कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून ट्रकचालक भुषण ओमकार तरारे (वय २४ वर्षे, रा. आझादनगर, कामठी, नागपूर) आणि क्लिनर सयद जसिन सयद असलम (वय ३३ वर्षे, रा. ताजबाग चौक, नागपूर) या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर या गुन्ह्यात सहभागी असलेले इतर दोन आरोपी राकेशकुमार यावकराम टेकाम आणि मोसिन हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
कारवाईदरम्यान पोलिसांनी १५ लाख रुपये किमतीचा १० चक्का टाटा ट्रक, ७ लाख रुपयांचे ३५ नग गोवंश आणि ३५ हजार रुपये किमतीचे २ मोबाईल हँडसेट असा एकूण २२ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस स्टेशन भद्रावती येथे सर्व आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६० चे कलम ११(१)(घ)(ड)(च)(ज), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ चे कलम ९(अ), ९, ११ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम ३(१) व ४९ अन्वये विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील सखोल तपास भद्रावती पोलीस करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे अवैध गोवंश तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






