चंद्रपूर: Chandrapur Illegal Sand Mining प्रकरणी रामनगर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. चंद्रपूर ते नागपूर हायवेवर पोलिसांनी अवैध रेतीची तस्करी करणारे दोन सोळा चक्का ट्रक जप्त केले. या कारवाईत पोलिसांनी रेती आणि ट्रक्ससह तब्बल ८१ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. अमरावती येथील दोन ट्रकचालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. (हे हि वाचा – एमडी पावडरची तस्करी, बल्लारपूर पोलिसांची कारवाई)
ताडपत्रीने झाकलेल्या ट्रकमधून विनापरवाना रेतीची वाहतूक
मिळालेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंद्रपूर ते नागपूर जाणार्या रोडवरील राहुल ढाब्याजवळील हायवे रोडवर पोलीस पथक अवैध वाहतूक, फॅन्सी नंबर प्लेट व इतर वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी नाकाबंदी करत होते. या दरम्यान चंद्रपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणारे दोन सोळा चक्का ट्रक ताडपत्रीने पूर्णपणे झाकलेल्या अवस्थेत येताना दिसले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी दोन्ही वाहनांना थांबण्याचा इशारा केला.
वाहनांची कसून पाहणी केली असता, दोन्ही ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर रेती (गौण खनिज) भरलेली असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी चालकांकडे रेती वाहतुकीबाबत रॉयल्टी व अधिकृत कागदपत्रांची विचारणा केली, मात्र त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना किंवा कागदपत्रे नव्हती. चोरट्या मार्गाने विनापरवाना ही वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही वाहने आणि त्यातील रेती जप्त केली.
अमरावतीच्या दोन ट्रकचालकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
या कारवाईत पोलिसांनी अमरावती येथील दोन चालकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये टाटा कंपनीचा १६ चक्का ट्रक क्रमांक CG 08 L 8098 चा चालक सय्यद साकीब सय्यद साबीर (वय ३१ वर्ष, रा. छायानगर, उस्मान घासलेट वाले यांच्या घराजवळ, अमरावती) आणि दुसरा १६ चक्का ट्रक क्रमांक MH 49 AT 4969 चा चालक अब्दुल अहमद अब्दुल साहीद (वय ३८ वर्ष, रा. दाढी वार्ड क्र. २, समाज मंदिर जवळ, अमरावती) यांचा समावेश आहे.
कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात ४० लाख रुपये किमतीचा ट्रक क्रमांक CG 08 L 8098 व त्यातील सुमारे ६५ हजार रुपये किमतीची १३ ब्रॉस रेती (एकूण ४०,६५,००० रुपये), तसेच ४० लाख रुपये किमतीचा दुसरा ट्रक क्रमांक MH 49 AT 4969 व त्यातील सुमारे ६० हजार रुपये किमतीची १२ ब्रॉस रेती (एकूण ४०,६०,००० रुपये) असा एकूण ८१ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज समाविष्ट आहे.
याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १०१०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२), ३(५), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे सहकलम ४८(७), ४८(८) आणि मोटर वाहन कायद्याच्या १३९/१७७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोहवा संदीप भोयर, पोहवा संजु देशवाले, पोहवा संपत बंडी व पोअं. रूपेश वाढई यांच्या पथकाने केली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






