चंद्रपूर: चंद्रपूर रेती तस्करी विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १६ चक्का वाहनातून अवैध रेती वाहतूक होत असल्याचे उघड झाले. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार नाकाबंदी करून संशयास्पद वाहनाची झडती घेण्यात आली. त्यात विनापरवाना रेती आढळली. या कारवाईत वाहन, सुमारे १० ब्रास रेती आणि मोबाईल असा एकूण ४० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (घुग्गुस ट्र्क जाळपोळ प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा, वाचा बातमी)
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका मोठ्या वाहनाद्वारे अवैधरित्या गौण खनिजाची चोरटी वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ रामनगर हद्दीत सापळा रचून नाकाबंदी केली. या दरम्यान संशयास्पद रितीने येणाऱ्या एका मोठ्या १६ चक्का पल्ला वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये विनापरवाना व अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वाहन आणि रेती आपल्या ताब्यात घेतली.
या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालक नविनकुमार महाबीर सिंग (वय ४०, रा. फुलूटोला तफरदे, ता. पुरेनी बाजार, जि. मधेपुरा, बिहार) याच्यासह वाहनाचा मालक वाहिद झबीर शेख (रा. उमरेड, ता. उमरेड, जि. नागपूर) यांच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) सह महाराष्ट्र जमीन महसूल कायदा आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे.
मुद्देमाल जप्त
या धडक कारवाईत पोलिसांनी महिंद्रा कंपनीचे १६ चक्का पल्ला वाहन (क्रमांक MH 40 CV 9333), अंदाजे १० ब्रास रेती आणि एक वापरता मोबाईल असा एकूण ४० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उपविभाग राजुरा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली असून, या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






