बल्लारपूर – Ballarpur Drug Crime प्रकरणात बलारशाह पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रेल्वे मालधक्का परिसरात पोलिसांनी रंगेहात दोघांना अटक केली. आरोपींकडून एम.डी. अमली पदार्थ जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची किंमत १ लाख ७ हजार ९०० रुपये आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास करण्यात आली. (हे हि वाचा – पोंभुर्ण्यात सुगंधित तंबाखू जप्त, व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल)
अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत अमली पदार्थासह दोघांना रंगेहात अटक केली आहे. ही धडक कारवाई गुरुवारी (१३ ऑगस्ट २०२६) रात्रीच्या सुमारास बलारशाह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे मालधक्का परिसरात करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ७ हजार ९०० रुपयांचा ऐवज जप्त केला असून त्यात एम.डी. (मॅफेड्रोन) सदृश अमली पदार्थ आणि एका दुचाकीचा समावेश आहे.
रेल्वे मालधक्का परिसरात पोलिसांचा सापळा
मिळालेल्या माहितीनुसार, बलारशाह पोलिसांना रेल्वे मालधक्का परिसरात दोन संशयित तरुण बजाज पल्सर मोटारसायकलवरून एम.डी. हा अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. बातमीची खात्री पटल्यानंतर पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश दिगांबर जोगदंड यांच्या नेतृत्वात पथकाने तातडीने नाकेबंदी आणि छापेमारीची तयारी सुरू केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांची तोंडी व लेखी परवानगी घेऊन, तसेच दोन शासकीय पंच, इलेक्ट्रॉनिक वजन काटा व्यावसायिक आणि छायाचित्रकाराला सोबत घेऊन पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.
रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास रेल्वे मालधक्का परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचला. तेथे पल्सर दुचाकी (क्र. MH34 BJ5254) जवळ उभ्या असलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे धनेश अनिल ढोरे (वय २२, रा. पारडगाव, ता. ब्रह्मपुरी) आणि विक्रमसिंग सबजीतसिंग टाक (वय २३, रा. जुनोना चौक, बाबूपेठ, चंद्रपूर) अशी सांगितली.
कायदेशीर प्रक्रिया पार पाडत पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत आरोपी धनेश ढोरे याच्या पॅन्टच्या खिशातील माचीसच्या डबीत प्लास्टिकच्या पारदर्शक पिशवीत ४.६५० ग्रॅम वजनाची पिवळसर तपकिरी रंगाची पावडर आढळून आली. सदर पावडर ही एम.डी. सदृश अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले, ज्याची बाजारपेठेतील किंमत सुमारे २७ हजार ९०० रुपये आहे. याशिवाय गुन्ह्यात वापरलेली ८० हजार रुपये किमतीची जुनी पल्सर दुचाकी असा एकूण १ लाख ७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
आरोपींनी हा अमली पदार्थ नागपूर येथून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश जोगदंड यांच्या तक्रारीवरून बलारशाह पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act, 1985) मधील कलम ८(क), २१(ब) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस निरीक्षक अनिल दुधाराम राऊत करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






