Pombhurna Tobacco Raid Seized Tobacco Products

पोंभूर्णा येथे सुगंधीत तंबाखू जप्त; व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 14, 2026

पोंभुर्णा : Pombhurna Tobacco Raid प्रकरणी पोंभूर्णा येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. दुकानातून बंदी असलेला सुगंधीत तंबाखू व हुक्का साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दुकानाच्या मालकावर पोंभूर्णा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडक कारवाईने स्थानिक बेकायदेशीर व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (हे हि वाचा – चंद्रपूर MSRTC वसाहतीमधून दुचाकी चोरी)

पोंभूर्णातील ‘मे. शिवम कन्फेक्शनरी’ दुकानावर धाड

राज्य शासनाने बंदी घातलेल्या सुगंधीत तंबाखूची अवैध साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. पोंभूर्णा शहरातील ‘मे. शिवम कन्फेक्शनरी’ या दुकानातून बंदी असलेला सुगंधीत हुक्का व शिशा तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी व्यावसायिक कमलेश उर्फ बंटी परमानंद लछवानी (वय ४५, रा. मूल, जि. चंद्रपूर) याच्याविरुद्ध पोंभूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यापारी कमलेश लछवानी याच्यावर गुन्हा दाखल

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन (महाराष्ट्र राज्य) चंद्रपूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी मेघा धनवृत्तीराव फाळके (वय ३८) यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल शंकर ठेंगणे व त्यांच्या पथकाने पोंभूर्णा येथील ‘मे. शिवम कन्फेक्शनरी’ या दुकानात धाड टाकून तपासणी केली असता तेथे शासनाने बंदी घातलेला सुगंधी तंबाखूचा साठा मिळून आला.

या धाडीत ‘झेन प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ अहमदाबाद निर्मित ‘झोला हुक्का शिशा तंबाखू’चे १५९० रुपये किमतीचे ६ पाकीट आणि ‘ईगल हुक्का शिशा तंबाखू’चे १२४५ रुपये किमतीचे ३ पाकीट, असा एकूण २८३५ रुपये किमतीचा १८०० ग्रॅम वजनाचा साठा जप्त करण्यात आला. यातील काही साठा विश्लेषणासाठी नमुने म्हणून घेण्यात आला असून उर्वरित १४०० ग्रॅम साठा पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा आयुक्तांनी १३ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार गुटखा, पानमसाला, खरा, सुगंधी तंबाखू व सुगंधी सुपारीच्या निर्मिती, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर एका वर्षासाठी पूर्ण बंदी घातली आहे. असे असतानाही आरोपीने नफ्याच्या उद्देशाने या मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या पदार्थांचा साठा केल्याचे स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी मेघा फाळके यांच्या तक्रारीवरून आरोपी कमलेश उर्फ बंटी लछवानी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १२३, २७४, २७५, २२३ सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या विविध कलमान्वये पोंभूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रतिबंधित माल कोणाकडून मागवण्यात आला आणि तो कोणाला पुरवला जाणार होता, यादृष्टीने पोलीस आता ग्राहक आणि पुरवठादारांपर्यंत तपास करत आहेत. या प्रकरणात आरोपीवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाल्यास त्याच्यावर ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कारवाई प्रस्तावित केली जाऊ शकते, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment